शिवाजी विद्यापीठात जगदीश खेबुडकरांचे दालन

शिवाजी विद्यापीठात जगदीश खेबुडकरांचे दालन

कोल्हापूर - दिवंगत कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची साहित्य-संपदा जतन करण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात लवकरच  खेबुडकरांचे स्वतंत्र दालन साकारणार असून, यात खेबुडकरांचा जीवनप्रवास रसिकांना अनुभवता येईल. त्यांच्या पहिल्या कवितेपासून त्यांनी लिहिलेली गीते, पटकथा असा अलौकिक ठेवा या निमित्ताने भावी पिढ्यांसाठी उपलब्ध होईल. 

मराठी भाषा संशोधकांसाठीही हे दालन पर्वणी ठरेल. जगदीश खेबुडकर कुटुंबीय आणि विद्यापीठ प्रशासनाकडून आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे, लवकरच त्याला मूर्त स्वरूप येईल. 
कोल्हापूरला कलानगरी अशी ओळख देणाऱ्या प्रतिभासंपन्न व्यक्तींमध्ये जगदीश खेबुडकर यांचा समावेश होतो. त्यांनी लिहिलेल्या गीतांनी मराठी चित्रपटांना आणि मराठी भाषेला वैभव मिळाले.

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक वसंत पवार यांच्यापासून ते अलीकडच्या पिढीतील अजय-अतुल यांच्यापर्यंत सुमारे ४८ संगीत दिग्दर्शकांनी खेबुडकरांकडून आवर्जून गीते लिहून घेतली. ‘आकाशी झेप घे रे पाखरा...’, ‘विठू माऊली तू माऊली जगाची...’ या भक्तिगीतांपासून ते ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची...’ अशा ठसकेबाज लावण्यांपर्यंत सर्व प्रकारची गीते त्यांनी लिहिली. याशिवाय मालिका, नाटकं, चित्रपटांच्या पटकथा असे चतुरस्र लेखन खेबुडकरांनी केले. हा मोलाचा ठेवा जतन करून त्यावर अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यातून काव्य, भाषा याबाबतची अनेक महत्त्वपूर्ण माहिती, जगदीश खेबुडकरांनी केलेले निरनिराळे प्रयोग अभ्यासता येतील. खेबुडकर कुटुंबीय आणि शिवाजी विद्यापीठ यांनी या दालनाचा आराखडा बनवला आहे.

या दालनात जगदीश खेबुडकर यांची गीते, पटकथा, संवाद, चित्रपटलेखन, नाटक, मालिकांची शीर्षकगीते यांसह त्यांच्या वस्तू, त्यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग, आठवणी वेगवेगळ्या स्वरूपात असतील. याबाबतचा आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. जागेची निश्‍चिती करून प्रत्यक्ष दालन उभारणीला प्रारंभ होईल.  

हाडाचा शिक्षक, हळव्या मनाचा कवी, अर्थपूर्ण गीतांचा रचनाकार, सामाजिक जाणिवांचा लेखक अशा सर्व दृष्टिकोनांतून जगदीश खेबुडकर हे महान होते. त्यांच्या साहित्याचे जतन करण्यासाठी विद्यापीठ हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. या दालनाच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिभेचा रसास्वाद सर्वसामान्यांना घेता येईल. विद्यापीठ प्रशासनही याबाबत सकारात्मक असून लवकरच हे दालन साकारले जाईल.  
- कविता खेबुडकर,
जगदीश खेबुडकर यांच्या कन्या. 

जगदीश खेबुडकर हे कोल्हापूरचे अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्त्व होय. त्यांचा साहित्यठेवा दालनाच्या माध्यमातून जतन करण्याचे शिवाजी विद्यापीठाने ठरवले आहे. हा प्रस्तावित प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. खेबुडकर यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून अंतिम आराखडा ठरवला जाईल. या दालनाचा उपयोग विद्यार्थी, भाषासंशोधक, चित्रपटअभ्यासक यांना निश्‍चित होईल. 
- डॉ. देवानंद शिंदे,
कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ.

खेबुडकरांची साहित्य संपदा

  •  चारशे मराठी चित्रपटगीते
  •  चार हजार कविता
  •  २५ पटकथा, संवाद
  •  ५० लघुकथा
  •  ५ नाटके 
  •  १० खंडकाव्य
  •  ४ मालिका (दूरदर्शन) 
  •  ४ टेलिफिल्म
  •  ५ मालिका गीते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com