मजुरीवाढीवरून गूळ सौदे ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

कोल्हापूर - गूळ बाजारात आज माथाडी कामगारांनी मजुरीवाढीच्या मुद्यावरून जोरदार वादावादी करत काम बंद आंदोलन केले. परिणामी गूळ सौदे बंद राहिले. तब्बल दोन तास बाजार समितीत शेतकरी, अडते, व्यापारी यांची बैठक झाली; पण ठोस निर्णय होऊ शकला नाही. सौदे होऊनही मालाचा उठाव बंद झाला. गतवर्षीचाच कित्ता गिरवत ऐन हंगामात माथाडी कामगारांनी सौदे बंदचा खो घातला आहे.

कोल्हापूर - गूळ बाजारात आज माथाडी कामगारांनी मजुरीवाढीच्या मुद्यावरून जोरदार वादावादी करत काम बंद आंदोलन केले. परिणामी गूळ सौदे बंद राहिले. तब्बल दोन तास बाजार समितीत शेतकरी, अडते, व्यापारी यांची बैठक झाली; पण ठोस निर्णय होऊ शकला नाही. सौदे होऊनही मालाचा उठाव बंद झाला. गतवर्षीचाच कित्ता गिरवत ऐन हंगामात माथाडी कामगारांनी सौदे बंदचा खो घातला आहे.

बाजारात गुळाची आवक नियमितपणे सुरू आहे. गुळाला भावही चांगला आहे. ऐंशी हजार गूळ रवे सौद्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना सौदे सुरू झाले. त्यानंतर काही वेळातच बॉक्‍स भरण्याचे आम्हाला जादा पैसे द्यावेत, अशी मागणी करत माथाडींनी वादावादी सुरू केली. बाजार समिती सचिव मोहन सालपे यांनी मध्यस्थी करीत माथाडींना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माथाडींचा एक गट आम्ही काम करणार नाही, या भूमिकेवर ठाम राहिला, तर काही माथाडींनी काम सुुरू करू, सौदे संपल्यानंतर बैठक घेऊन चर्चा करू, अशी भूमिका घेतली. काहींनी जाणीवपूर्वक वाद वाढवत सौद्यातून माघार घेतली. त्यामुळे तोलाई, पॅकिंग, मालाची उचल अशी कामे बंद पडली. परिणामी सौदे काढणे अशक्‍य झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी तुमचा वाद सौद्यानंतर मिटवा, आमचे नुकसान करू नका, अशी विनवणी केली. पण माथाडी कामगार आपल्या मागण्यावरून हटले नाहीत. अखेर बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. जे काम वेळेत पूर्ण होत नाही त्या कामासाठी तुम्हाला जादा वेळ द्यावा लागत असेल तर जादा पैसे मागून कसे चालेल, बाजाराची कोंडी करू नका, तुमच्या कामाचा योग्य मोबदला ठरल्याप्रमाणे देण्यात येईल, असे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांना सांगितले. तरीही त्यांचे समाधान झाले नाही. दोन तास चर्चेतूनही मार्ग निघाला नाही. यामुळे सौदे बंदच राहिले. 

प्रत्येक वर्षी हाच वाद
गेल्या वर्षीही माथाडी कामगारांनी ऐनवेळी मजुरीवाढीचा मुद्दा काढत काम बंद आंदोलन सुरू केले व सलग तीन दिवस सौदे बंद पाडले होते. वास्तविक माथाडींना किती मजुरी द्यावी याबाबत लेखी करार झाले आहेत. तरीही कोणतीही पूर्वसूचना न देता ऐनवेळी काम बंद करून सौद्यांची कोंडी करायची, असा प्रकार सुरू केला होता. यंदा गुळाची आवक वाढलेली असताना माथाडींनी सौदे बंद पाडले आहेत. शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची कोंडी करायची, असा अट्टहास काही मोजक्‍या माथाडी नेत्यांकडून घडत आहे. अशा नेत्यांना चाप बसविण्यासाठी बाजार समिती काय पावले उचलणार, याबाबत गूळ सौदे वर्तुळात उत्सुकता आहे.

Web Title: jaggery auction stop