गुऱ्हाळांना मजूर, पाणीटंचाईने घरघर

विशाल गुंजवटे
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

बिजवडी - दुष्काळी परिस्थितीमुळे माण तालुक्‍यातील उसाचे बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. मजूर वर्ग व पाणीटंचाईमुळे माण तालुक्‍याबरोबरच बागायतदार सधन तालुक्‍यातील गुऱ्हाळघरांचेही अस्तित्व संपत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत माण तालुक्‍यात दोन गुऱ्हाळघरे मोठ्या धाडसाने चालवली जात असली, तरी त्यांनाही मजूर व पाणीटंचाईमुळे अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. 

बिजवडी - दुष्काळी परिस्थितीमुळे माण तालुक्‍यातील उसाचे बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. मजूर वर्ग व पाणीटंचाईमुळे माण तालुक्‍याबरोबरच बागायतदार सधन तालुक्‍यातील गुऱ्हाळघरांचेही अस्तित्व संपत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत माण तालुक्‍यात दोन गुऱ्हाळघरे मोठ्या धाडसाने चालवली जात असली, तरी त्यांनाही मजूर व पाणीटंचाईमुळे अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. 

ऐंशीच्या दशकात माणगंगा नदीकाठावरील दहिवडी, गोंदवले, बिदाल, राणंद ,जाशी, पळशी, लोधवडे या पट्ट्यात उसाचे विक्रमी उत्पादन घेतले जायचे. साखर कारखान्याला ऊस कमी पण गूळ बनविण्यासाठी हा ऊस जायचा. त्यामुळे दहिवडी, गोंदवले, बिदाल, राणंद, जाशी, पळशी, लोधवडे गावच्या परिसरात गुळाची गुऱ्हाळघरे खूप होती. त्या वेळी मजूर उपलब्ध असायचे. त्यामुळे उसाचा घाना रस्टन कंपनीच्या आडव्या इंजिनवर चालायचा. शिवाराशिवारात त्या इंजिनचा थोकडा घुमायचा व गुऱ्हाळघराच्या चिमणीतून धूर निघायचा. 

त्यानंतर मात्र सातत्याने दुष्काळाच्या सावटात बागायती ऊस शेती घटत गेली. त्याचा फटका गुऱ्हाळघरांना बसू लागला. जस जसे उसाचे क्षेत्र घटत गेले तसतसे गुऱ्हाळघरांना घरघर लागली. त्याचा फटका गुऱ्हाळ मालकण व कामगारांना बसला आहे. अनेक गुऱ्हाळ मालकांनी गुळाच्या कायली घाना व इंजिनवर झाकून ठेवल्या. दुष्काळ हटेल आणि उसाचे क्षेत्र पुन्हा वाढेल या आशेवर त्यांनी हे साहित्य जपून ठेवले; पण दुष्काळ हटता हटता तालुक्‍यातील गुऱ्हाळघरेच हटली; पण राणंद जाशी व लोधवडे परिसरात उसाच्या लागणी असल्याने जाशी व गोंदवलेत गुऱ्हाळ सुरू आहेत.

पूर्वी गुऱ्हाळघर चालविताना प्रत्येक गुऱ्हाळघरामागे ऊस तोडणीसाठी दहा, घाना चालविण्यासाठी सहा, चुलवानाला जाळ घालण्यासाठी चार, चोयट्या हलवण्यासाठी दोन, मुख्य म्हणजे गुळव्या एक व त्यांच्या हाताखाली दोन मळवे असा किमान वीस ते पंचवीस लोकांचा संघ लागायचा; पण तालुक्‍यातील बहुतांश गुऱ्हाळघरे बंद पडल्याने या कामगारांना काम मिळेनासे झाले. पर्यायाने हे कामगार दर वर्षी पावसाळ्यात नीरा, पाडेगाव, तर दिवाळीनंतर कोल्हापूर, कऱ्हाड, पाटण या भागांतील गुऱ्हाळावर पोटभरण्यासाठी स्थलांतर करीत असतात.

अशातच जाशी येथे माजी सरपंच उत्तमराव गलंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची मुले खडतर परिस्थितीतही गुऱ्हाळघर चालवण्याचा वारसा जपत आहेत.

‘‘गेल्या २५ वर्षांपासून गुऱ्हाळघर चालवले जात होते. मात्र, पाणीटंचाईमुळे उसाचे क्षेत्र कमी झाले. त्यात मजूर वर्गाच्या कमतरतेमुळे ते सात वर्षे बंद होते. आता पुन्हा घरातील लोकांच्या सहकार्याने आपल्या शेतातील उपलब्ध उसावर गुऱ्हाळघर टिकून आहे.’’
- सुनील गलंडे, जाशी

दररोज दोन आदणे गाळप करून गूळ तयार करतो. गुंतवणुकीच्या मानाने यातून उत्पन्न मिळत नाही. सर्वात मोठी अडचण या कामात कामगार टिकत नाहीत. त्यामुळे गुऱ्हाळ चालवताना कसरत करावी लागत आहे.
- अजित पोळ, गोंदवले खुर्द

Web Title: Jaggery Gurhal Labour Water Shortage