जैन मुनी चिन्मयसागर महाराजांचे महानिर्वाण

Jain Mun iChinmaysagar
Jain Mun iChinmaysagar

इचलकरंजी - जैन मुनी क्रांतिकारी राष्ट्रसंत प. पू. १०८ चिन्मयसागर महाराज ऊर्फ जंगलवाले बाबा यांचे आज कर्नाटकातील जुगूळ (ता. अथणी, जि. बेळगाव) येथे महानिर्वाण झाले. सकाळी नऊ वाजता जुगूळ येथे त्यांच्यावर धार्मिक विधीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

श्री चिन्मयसागर महाराजांचे मूळ नाव धरणेन्द्र कुमार मोले हे होय. त्यांचा जन्म जुगूळ येथे झाला होता. वीरसेवा दलात ते सक्रिय होते. श्री चिन्मयसागर महाराज यांनी १९८२ मध्ये ब्रह्मचारी व्रत तर १९८७ मध्ये मुनीदीक्षा घेतली होती. आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या हस्ते हा सोहळा झाला. श्री चिन्मयसागर महाराज यांनी आपले आयुष्य जंगलामध्येच अधिक काळ घालविले. घनदाट जंगलात घोर तपश्‍चर्या करणारे महान त्यागी म्हणून त्यांची ओळख होती. देशभरात त्यांनी विहार केला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आदिवासींसह लाखो नागरिकांना व्यसनमुक्त व शाकाहारी करण्याचे महानकार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची विशेष नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. धार्मिक, आध्यात्मिक, राष्ट्रीय कार्याचा अनेकवेळा सन्मान झाला आहे. मध्य प्रदेशसह विविध राज्यांचे विशेष अतिथी म्हणून त्यांचा सन्मान केला आहे.

प्रत्येक चातुर्मास कालावधीत समाजातील विविध घटकांना एकत्रित करून त्यांच्यात देशप्रेम व संस्कारक्षम कार्याची प्रेरणा वाढावी यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. वीरसेवा दल मध्यवर्ती समितीने २२ सप्टेंबर रोजी भव्य दिव्यावधान सोहळाही आयोजित केला होता. श्री चिन्मयसागर महाराज यांचे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती. त्यामुळे 
त्यांनी सहा दिवसांपूर्वी यमसल्लेखना घेतली होती. शुक्रवारी सकाळपासूनच त्यांची प्रकृती खालावली होती. सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. 

सकाळी नऊला अंत्यसंस्कार
श्री चिन्मयसागर महाराज यांची सकाळी ७ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता जुगूळ-मंगावती रोडवर खोतमळा या ठिकाणी अग्निसंस्कार विधी होईल. यावेळी आचार्य श्री १०८ जिनसेन महाराज, श्री १०८ चंद्रप्रभूसागर महाराज, श्री १०८ सूर्यसागर महाराज यांच्यासह विविध त्यागी व भट्टारक मुनींची उपस्थिती असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com