शाहू "आघाडी भारी'; पण "ताराराणी'च "कारभारी' 

jaisingpur
jaisingpur

जयसिंगपूर - उमेदवारांपेक्षा नेत्यांचे अस्तित्व ठरविणाऱ्या जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला बहुमत दिले असले तरी कारभारी म्हणून मात्र ताराराणी विकास आघाडीला कौल दिला आहे. शाहू आघाडीचे एकतर्फी वर्चस्व राहिलेल्या या पालिकेवर आता दोन्ही आघाड्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी नागरिकांनी दिली आहे. पालिकेच्या सत्तासंघर्षात यापुढे काम करणाऱ्याच्या हातातच पालिकेच्या किल्ल्या असतील, असेच संकेत निकालातून मिळाले असून, निकालाचा तालुक्‍याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होणार आहे. मोठा गवगवा झालेल्या या निवडणुकीत नागरिकांनी प्राध्यापिकेला नाकारून डॉक्‍टर असणाऱ्या नीता माने यांना स्वीकारले आहे. 

नगराध्यक्षा ताराराणीच्या, तर बहुमत शाहू आघाडीचे असे चित्र निकालातून स्पष्ट झाल्याने यापुढे कामे करावीच लागणार आहेत. येत्या पाच वर्षांत दोन्ही आघाड्यांना विकासकामातून आपले स्थान पक्के करावे लागणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासूनच पालिकेच्या राजकारणाची खलबते सुरू झाली आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक व खासदार राजू शेट्टी यांनी चार-पाच महिन्यांपासून पालिकेसाठी आघाडी करण्याच्या हालचाली केल्या. महाडिक गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य पक्ष, शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीबरोबर आमदार उल्हास पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिलराव यादव यांचीही ताकद "ताराराणी'ला मिळाली. 

"शाहू'चे नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांच्यासाठी अनपेक्षित असणारा हा निकाल मात्र भविष्यासाठी कस लावणारा आहे. ताराराणीलाही या निकालाने हुरळून जाण्याची गरज नसून पाच वर्षांतील कार्याचा लेखाजोखा घेऊनच पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने कामाला पर्याय नाही. ताराराणीने निकालातून पालिकेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पालिकेवर बहुपक्षीय सत्ता आली आहे. 

शिवसेनेची भूमिका अमान्य करत आमदार उल्हास पाटील यांनी ताराराणी आघाडीत घरोबा केला. शहरात शिवसेनेची ताकद ओळखूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता. आघाडीच्या माध्यमातून पालिकेच्या सत्तेत शिवसेनेला सहभागी होता आले असते, मात्र अंतर्गत कुरबुरीमुळे असे होऊ शकले नाही. आमदार पाटील यांची भूमिका योग्य असल्याचे निकालातून पुढे आले आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर विधानसभेचे संभाव्य उमेदवार आहेत. जयसिंगपूर शिरोळ तालुक्‍यातील सर्वात मोठे आणि झपाट्याने विकासाकडे झेपावणारे शहर असल्याने या शहरावर पकड ठेवून त्यांना विधानसभा सोपी झाली असती; मात्र निकालामुळे त्यांना आतापासूनच व्यूहरचनेसाठी पायाला भिंगरी बांधावी लागणार आहे, तर दुसरीकडे विद्यमान आमदार उल्हास पाटील, स्वाभिमानीचे सावकर मादनाईक यांच्यासह भाजपनेही पालिकेच्या सत्तेत प्रवेश केला असला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र ताराराणीचा करिष्मा चालणार नाही. 

सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्ता द्या, कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्याची ग्वाही दिली आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अपेक्षेहून जादा जागा नागरिकांनी त्यांच्या पदरात टाकल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर "शब्द' पाळण्याची वेळ नागरिकांनी आणली आहे. 

गुलाल लागलाच 
ताराराणी आघाडीच्या प्रचारसभेत खासदार राजू शेट्टी यांनी डॉ. अशोकराव माने यांना उद्देशून पालिका निवडणुकीसाठी तुम्ही विळ्या-भोपळ्यांना एकत्र आणले आहे. डॉ. सौ. निता माने यांच्या रूपाने चांगला उमेदवारही मिळाला आहे. आता गुलाल तुम्हाला लागणारच, असे जाहीर केले होते. सोमवारी निकालानंतर खासदार शेट्टी यांचे वक्तव्य सर्वांच्या लक्षात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com