जलदूत एक्‍स्प्रेसने जिल्ह्याच्या लौकिकात भर

बलराज पवार
शनिवार, 17 डिसेंबर 2016

डिजिटल गॅझेटियरचे काम सुरू - राज्यातील पहिला ई-अभिलेख कक्ष विट्यात सुरू 

डिजिटल गॅझेटियरचे काम सुरू - राज्यातील पहिला ई-अभिलेख कक्ष विट्यात सुरू 

सांगली - मावळत्या वर्षात जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालणारी घटना म्हणजे जलदूत एक्‍स्प्रेसद्वारे दुष्काळग्रस्त लातूरला करण्यात आलेला पाणीपुरवठा. देशात प्रथमच रेल्वेने एखाद्या शहराला पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आणि यामध्ये सांगलीचे नाव इतिहासात नोंदले गेले. याशिवाय राज्यातील पहिला ई-अभिलेख कक्ष विट्यात सुरू झाला. कृष्णा नदीवरील वसंतदादा स्मारकाशेजारचा घाट आता बोटिंग, तरंगते व्यासपीठ यामुळे पर्यटन केंद्र बनत आहे. जिल्ह्याचे डिजिटल गॅझेटियर तयार होत आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून नवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत. अशा विविध घटनांनी जिल्हा चर्चेत राहिला.

वसंतदादा, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू, क्रांतिसिंह नाना पाटील अशा दिग्गजांच्या कार्याने जिल्ह्याचे ब्रॅंडिंग करण्याचे काम जिल्हाधिकारी शेखर गायकवाड करत आहेत. त्याला यशही येत आहे. जिल्ह्याला देदीप्यमान इतिहास आहे. क्रांतिकारकांपासून समाजसेवक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक अशी मोठी पार्श्‍वभूमी आहे. त्याचा फायदा घेऊन जिल्ह्याचे ब्रॅंडिंग करायचे आणि जगाच्या नकाशावर जिल्हा आणायचा या महत्त्वाकांक्षेने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी काम चालवले आहे. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील नामवंत मंडळींना एकत्र आणून त्यांच्या सहकार्याने हे काम सुरू केले आहे.

नावीन्यपूर्ण योजनेतून विविध कामे
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेतून त्यांनी महापालिका क्षेत्रात तसेच जिल्ह्यातील महसूल कार्यालयांमध्ये वॉटर एटीएम सुरू केले आहे. महापालिका क्षेत्रात ओपन जिम सुरू करण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. कृष्णा घाटाचे सुशोभीकरण त्यांनी करून घेतले. त्यामुळे हा घाट आता शहरातील एक उत्तम पर्यटन स्थळ बनला आहे.

महसूल वसुलीत कमी
जिल्हा ब्रॅंडिंगसाठी ओळखला जाऊ लागला आहे, मात्र यंदा महसूल वसुलीत जिल्हा पिछाडीवर पडला आहे. आर्थिक वर्षातील गेल्या आठ महिन्यांत केवळ ४९.६४ टक्के वसुली झाली आहे. जिल्ह्याला एप्रिल १६ ते मार्च १७ अखेरचे उद्दिष्ट ८२ कोटी ३८ लाख रुपयांचे आहे. मात्र नोव्हेंबरअखेर ४० कोटी ८९ लाख रुपयेच महसूल गोळा झाला आहे. आता हे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी असले तरी गतवर्षी याच काळात केवळ ३१ टक्के महसूल गोळा झाला होता. त्या तुलनेत चांगले म्हणावे लागेल.

वाळू लिलावातून २४ कोटी रुपये
यंदा वाळू प्लॉटच्या लिलावातून २४ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. एकूण ६२ पैकी २४ प्लॉटचे लिलाव झाले आहेत. त्यांची मूळ किंमत १६ कोटी ७० लाख रुपये इतकी होती. त्यावर साडेआठ कोटी रुपयांचा जादा महसूल मिळाला आहे. गतवर्षी एवढेच प्लॉट गेले होते. यामधून १४ कोटी ३४ लाख रुपये महसूल मिळाला होता. यंदा या महसूलात वाढ झाली असली तरी गेली काही वर्षे वाळू प्लॉटचे लिलाव कमी संख्येने होत आहेत. गेल्या दोन वर्षांत निम्मे प्लॉटही जात नाहीत. तीन तीन वेळा किंमत कमी करून फेरनिविदा काढावी लागत आहे.

वाळू तस्करीला ऊत
एकीकडे जिल्ह्याच्या ब्रॅंडिंगसाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे वाळू तस्करीला ऊत आला आहे. दुष्काळी तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. बोर, माणगंगा, कृष्णा, येरळा या नद्यांमधून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. त्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकारही घडले. तर जप्त केलेली वाहने पोलिस ठाण्यातून दम देऊन पळवून नेण्याचे प्रकारही झाले. मुळात राजकीय वरदहस्त आणि कर्मचाऱ्यांनी हप्तेखोरी हे या वाळू तस्करीमागचे प्रमुख कारण आहे. गेला महिनाअखेरपर्यंत वाळूतस्करी करणाऱ्या ३६४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांना दोन कोटी ५६ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. मात्र कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या तस्करांवर अजूनही फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत.

लाचखोरीचे गालबोट
दरवर्षी लाच घेताना सापडणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये महसूलचे किमान आठ ते दहा जण असतात. गतवर्षी आठ जण सापडले होते. तर यंदा आतापर्यंत सहा जण सापडले आहेत. यामध्ये पाच तलाठी आणि एक कोतवाल आहे. यात सात आरोपी आहेत.

जलदूत एक्‍स्प्रेसचा विक्रम
मराठवाड्यातील लातूर शहराला मिरजेतून पाणी पुरवण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून नवीन पाइपलाइन टाकून घेतली. त्यानंतर मिरज ते लातूर अशी जलदूत एक्‍स्प्रेस सुरू केली. सुमारे दोन महिने ५० वॅगनची ही एक्‍स्प्रेस लातूरला पाणीपुरवठा करत होती. यातून दररोज २५ लाख लिटर पाणी पाठवण्यात येत होते. एखाद्या शहराला इतके दिवस रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा हा एक जागतिक विक्रमच असेल. याची दखल जगाने घेतली.

Web Title: jaldoot express prestige in district