पंढरपूरमध्ये पाण्यात बुडून जळगावमधील तरुणाचा मृत्यू

अभय जोशी
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पंढरपूरः चंद्रभागा नदीच्या पाण्यात बुडून आज (बुधवार) जळगाव येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. राहुल रविंद्र काथार (वय 25) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.

पंढरपूरः चंद्रभागा नदीच्या पाण्यात बुडून आज (बुधवार) जळगाव येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. राहुल रविंद्र काथार (वय 25) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.

या घटनेची समजलेली माहिती अशी की, जळगाव येथील नितीन दत्तू कुबर, राजेंद्र अशोक सोनार, भरत रविंद्र काथार आणि राहुल रविंद्र काथार हे चार जण श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास ते नदी काठी स्नानासाठी गेले होते. उजनी धरणातून नदीत पाणी सोडण्यात आलेले असल्याने नदीची पाण्याची पातळी वाढलेली आहे. राहुल काथार हा होडीला धरुन अंघोळ करत होता. त्याला पोहता येत नव्हते. त्यावेळी होडीचा हात सुटून तो पाण्यात बुडाला. तिथे असलेल्या त्याच्या सोबतचा भाऊ आणि अन्य दोन जणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पाण्यात बुडाला. त्यांचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेल्या कोळी बांधवांनी पाण्यात शोध घेऊन राहुल यास पाण्याबाहेर काढले. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तथापी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस हवालदार श्री.वाघमोडे पुढील तपास करीत आहेत.

आठवड्यात तीन जणांचे नदीत बुडून मृत्यू
या आठवड्यात शुक्रवारी कर्नाटकातील लखन टोपे यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी नदी पात्रात मुंढेवाडी बंधाऱ्याजवळ मंगळवेढा तालुक्यातील सरगर (खुर्द) येथील सचिन शामराव बिराजदार यांचा मृतदेह सापडला होता. तर आज जळगावच्या राहुल काथारचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. नदीची पाण्याची पातळी वाढलेली असल्याने नदीतीरावर सुरक्षा रक्षक तैनात करुन भाविकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्याची गरज आहे.

Web Title: jalgaon rahul kathar Due to drowning in water in Pandharpur