आठ हजार कामे... महिने फक्त दोनच!

विशाल पाटील
शनिवार, 22 एप्रिल 2017

सातारा - जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे दोन महिन्यांत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाची धांदल उडाली आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील तब्बल आठ हजार ७८५ कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. 

सातारा - जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे दोन महिन्यांत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाची धांदल उडाली आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील तब्बल आठ हजार ७८५ कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. 

‘जलयुक्‍त’ अभियानातच्या पहिल्या टप्प्यात २०१५- १६ मध्ये सातारा जिल्ह्याने भरीव कामगिरी केली. ‘जलयुक्‍त’च्या धर्तीवर अभियान राबविण्यासाठी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांना निमंत्रित केले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात जलयुक्‍त शिवार अभियानात साताऱ्याने कच खाल्याची स्थिती आहे. केवळ कोरेगाव तालुका व वेळे ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविले. सातारा जिल्हा अथवा जिल्हाधिकाऱ्यांना ते स्थान मिळविता आले नाही. 

दुसऱ्या टप्प्यात २०१६- १७ मध्ये जिल्ह्यातील २१० गावांचा समावेश आहे. सर्व शासकीय यंत्रणामार्फत कामे करण्याचा आराखडा बनविला गेला. त्यामुळे सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, शेततळे, पाझर तलाव दुरुस्ती, सलग समतल चर, भूजल पुनर्भरण, ठिबक, तुषार सिंचन, दुरुस्तीची कामे, नदी पुनरुज्जीवन हे कामे हाती घेतली गेली. मात्र, अभियानात लोकसहभाग कमी असल्याने, तसेच शासकीय उदासीनता आल्याने कामे गतीने झाली नाहीत. आजवर केवळ दोन हजार २२४ कामे पूर्ण झाली असून, एक हजार ७१ कामे प्रगतिपथावर आहेत. अद्यापही सुमारे तीन हजार कामांना सुरवातही झालेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनापुढे तब्बल चार हजार कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान आहे. मुख्यमंत्र्यांकडून पुढील आठवड्यातच या कामांचा फेरआढावा घेतला जाणार असल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे. लोकसहभाग, कंपन्या, संस्था, ट्रस्ट, बॅंकांकडून सामाजिक उत्तर दायित्वापोटी (सीएसआर) मिळणाऱ्या निधीचेही प्रमाण कमी असल्याने या कामांत अडथळे उभे राहात आहेत.
ही कामे होणार...
सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, शेततळे, पाझर तलाव दुरुस्ती, सलग समतल चर, भूजल पुनर्भरण, ठिबक, तुषार सिंचन, दुरुस्तीची कामे, नदी पुनरुज्जीवन.

ही आहे वस्तुस्थिती...
प्रस्तावित कामे ११ हजार ९
कामे पूर्ण- दोन हजार २२४ 
प्रगतिपथावरील कामे-  एक हजार ७१ 
सुरू न झालेली कामे- आठ हजार ७८५
(कृषी विभागाकडील माहितीनुसार)

जलयुक्‍त शिवार अभियानच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना निवडणूक आचारसंहितांमुळे विलंब लागला. उर्वरित कामे मे, जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशीलत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यातीलही कामे मार्गी लावली जातील.
- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

कामाच्या दर्जाचे व्हावे ऑडिट
पुढील पावसाळ्यात चांगल्या पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला असल्याने त्याचा जलयुक्‍त शिवार अभियानास फायदा होईल. त्याचा विचार करूनच ही कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, कामे गतीने पूर्ण करण्याबरोबर त्याचा दर्जा राखणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामे पूर्ण होताच, त्याचे तत्काळ त्रयस्थांकडून ऑडिट व्हावे, अशी अपेक्षाही नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

Web Title: jalyukta shivar scheme work