योगेशला उद्योजक, तर राकेशला व्हायचे होते अभियंता 

jamkhed murder case yogesh and rakesh
jamkhed murder case yogesh and rakesh

जामखेड - पूर्ववैमनस्यातून पंचवीसीतल्या दोन तरुणांची रहदारीच्या बीड रस्त्यालगत बाजार समितीच्या कॉम्प्लेक्‍ससमोर दिवसाढवळ्या पिस्तुलातून गोळ्या झाडून निर्घृण हत्या झाली. फुलासारखे सांभाळलेला पोटचा गोळा गेल्याने राळेभात परिवार दुःखात थिजून गेला आहे. पूर्णपणे कोलमडला आहे. 

राळेभात परिवारासाठी शनिवार (ता. 28) काळा दिवस ठरला. शेतकरी कुटुंबातील हे दोन्ही युवक कुटुंबांचा आधार बनण्याची धडपड करीत होते. उद्योजक होण्याचे स्वप्नं उराशी बाळगलेला योगेश आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणारा राकेश किरकोळ भांडणाचे बळी ठरले. हल्लेखोरांनी दोघांच्याही छातीत गोळ्या मारल्या होत्या. योगेश जागेवरच निपचित पडला होता. मात्र, राकेशने तब्बल अडीच तास मृत्यूशी झुंज दिली. मात्र, नियतीने साथ दिली नाही. सारे काही निस्तब्ध झाले. पाहिलेली स्वप्ने, त्यांनी ठरविलेल्या वाटा अर्ध्यावरच राहिल्या. 

दोघांच्याही चांगुलपणाचे गोडवे नातेवाईक गातात. योगेश पदवीधर तरुण. त्याने दोन वर्षांपूर्वी मिनरल वॉटरचा व्यवसाय सुरू केला. त्याला जेसीबी यंत्र घ्यायचे होते, मोठे हॉटेल टाकून 'उद्योजक' म्हणून नाव मिळवायचे होते. 'युवक राष्ट्रवादी'च्या जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारीही काही काळ त्याने सांभाळली. नगरपालिका निवडणुकीत त्याची पत्नी अर्चना रिंगणात उतरली होती. त्यांना लक्षणीय मतेही मिळाली. मात्र, विजयापर्यंत पोचता आले नाही. योगेशच्या मागे आई-वडील, भाऊ कृष्णा, भावजय रोहिणी, पत्नी अर्चना व चार वर्षांचा मुलगा हर्षवर्धन असा परिवार आहे. 

हत्येपूर्वी राकेशने दिला अभियांत्रिकीचा पेपर 
राकेश ऊर्फ रॉकीचा कालच (शनिवारी) अभियांत्रिकीचा शेवटचा पेपर झाला. अभियांत्रिकीची पदवी घेऊन तो कुटुंबाचा आधार बनू पाहत होता. त्याला ऐतिहासिक साहित्याची मोठी आवड. शिवजयंती उत्सवात तो छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करीत असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर कुटुंबासाठी खूप काही करायचे, त्याचे स्वप्न होते. मात्र, सारी स्वप्ने अधुरीच राहिली. राकेशच्या मागे आई-वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.?

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com