जनता दलाचा करिश्‍मा गडावर कायम 

NCP
NCP

गडहिंग्लज : नगराध्यक्षपदासाठीचा खमका चेहरा, पक्षाचा तळागाळातील लोकसंपर्क, रिंगणात उतरविलेले जनतेतील चेहरे, सोयीच्या आरक्षणामुळे विरोधकांच्या आधी सुरू केलेले काम, प्रत्येक मतदारांपर्यंत राबणारे कार्यकर्ते आणि पथ्यावर पडलेला विरोधकांतील गोंधळ हे प्रमुख मुद्दे जनता दलाच्या विजयाला कारणीभूत ठरले. याउलट नगराध्यक्षपदासाठी ऐनवेळी घेतलेले उमेदवार, नवखे चेहरे आणि प्रचारात नसलेला आक्रमकपणा या कारणांमुळे विरोधी राष्ट्रवादी व भाजप-शिवसेनेच्या युतीला पराभवाचे तोंड पाहावे लागले. 

अलीकडच्या काळात पहिल्यांदाच जनता दल, राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना युती अशी तिरंगी लढत झाली. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जाहीर झालेले आरक्षणाचे फासे अधिकाधिक जनता दलाच्याच पथ्यावर पडले. कोणाशी युती करण्याच्या भानगडीत न पडता जनता दल 'एकला चलो रे'ची भूमिका अखेरपर्यंत कायम ठेवली. सुरवातीला स्वबळाचा नारा दिलेल्या राष्ट्रवादीने शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेसचा हात सोबत घेण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाल्याने राष्ट्रवादी ऐनवेळी एकटी रिंगणात उतरली. अखेर कॉंग्रेसचे व्हायचे तेच झाले. आघाडीच्या वाटाघाटीत कॉंग्रेसची वाताहतच झाली. 

राज्य व केंद्रातील सत्तेमुळे भाजप व शिवसेनेला निवडणुकीत जोरदारपणे उतरून आलटून-पालटून सत्ता भोगणाऱ्या राष्ट्रवादी व जनता दलाला सशक्त पर्याय देण्याची संधी होती. परंतु, उमेदवार निवडण्यापासूनच स्वत:च्या पायावर दगड मारून घेतल्याचा प्रकार या पक्षांच्या बाबतीत घडला. युती करायची की नाही, केली तर कोणाशी करायची याच चक्रव्यूहात अडकल्याने हे पक्ष बॅकफुटवर पडल्याचे निकालावरून स्पष्ट होते. विरोधी आघाडींच्या उमेदवारांची जुळणी होईपर्यंत जनता दलाने मतदारांपर्यंत पोचण्याची एक फेरी पूर्णही केली होती. प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले; परंतु राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यात नेहमी असलेला आक्रमकपणा या वेळी दिसला नाही. जनता दल-राष्टवादीत मैत्रीपूर्ण लढतीच्या त्यांच्या वक्तव्यामुळेही मतदार व कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. अखेरच्या काही दिवसांत प्रचारात आघाडी घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्नही विजयापर्यंत पोचवू शकला नाही. 

जनता दलाचे नेते ऍड. श्रीपतराव शिंदे व कन्या सौ. स्वाती यांच्यावर राष्ट्रवादीकडून झालेला घराणेशाहीचा आरोप मतदारांनीच झिडकारल्याचे स्पष्ट झाले. याउलट जनता दलाने राष्ट्रवादीच्या साडेतीन वर्षांतील गोंधळावर ठेवलेले बोट मतदारांना आपलेस करण्यास पुरेसे ठरले. भाजप-शिवसेनेला येथे खमके नेतृत्व मिळाले नाही. याशिवाय बहुतांशी प्रभागात दोन्ही पक्षांचे राहिलेले उमेदवारही युती बॅकफूटवर जाण्यास कारणीभूत ठरली. प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री, शिवसेनेचे खासदार येथे आले. राज्यातील सत्तेमुळे शहराला निधी मिळण्याचा मार्ग सोपा होण्याची त्यांची घोषणा मतदारांनीच हवेत विरघळवली. 

विकासाचे आव्हान 
आपले प्रतिनिधी निवडताना मतदारांनी काळजीही घेतली आहे. जनता दलाकडे पूवीच्या सभागृहात होत्या तशाच दहा जागा पुन्हा दिल्या आहेत. त्यातही पाच मुरब्बी तर पाच नवख्या चेहऱ्यांना संधी देत समन्वय साधला. विरोधकांत मात्र फाळणी करून मतदारांनी राष्ट्रवादीला चार व युतीला तीन जागा दिल्या. नव्या सभागृहासमोर शहर विकासाची मोठी आव्हाने आहेत. जाहीरनाम्यातून जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी साऱ्यांना सोबत घेऊन कंबर कसावी लागेल. हे आव्हान आता जनता दल कसे पेलते, याकडेही जनतेचे लक्ष राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com