जत कृषी प्रदर्शनाचा निधी रोखला

जत कृषी प्रदर्शनाचा निधी रोखला

सांगली - जिल्हा परिषद पदाधिकारी, प्रशासनाला विश्‍वासात न घेता जत येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचा १० लाख निधी रोखला. प्रदर्शनावर पदाधिकारी, सदस्यांनी बहिष्काराचा निर्णय सभेत झाला. विश्‍वासात न घेता प्रदर्शन भरविणारे कृषी सभापती संजीव सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी सदस्यांनी केली. दरम्यान, सभापती सावंत यांनी जत यात्रेत प्रदर्शन भरवण्याचा कालावधी अत्यल्प असल्याने अनावधानाने घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. अध्यक्षा स्नेहल पाटील यांनी यापुढे आर. आर. पाटील यांच्या नावाने प्रतिवर्षी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच घेण्याचे धोरण राहील, असे स्पष्ट केले. 

 राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या स्मृतिनिमित्त स्वीय निधीतून गेल्या दोन वर्षापासून प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी हे प्रदर्शन आटपाडी येथे भरवण्यात आले होते. त्यावेळीही एका खासगी कंपनीकडे प्रदर्शनाची जबाबदारी दिल्यामुळे निधी देण्यास असमर्थता दर्शवली होती. यंदाच्या दुसऱ्या वर्षीही प्रदर्शनासाठी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मात्र प्रदर्शन केव्हा, कोठे, निमंत्रण पत्रिका छपाईतील गोंधळावरून अध्यक्षा पाटील यांनी सभापती सावंत यांच्यासह अधिकाऱ्यांना पत्रिकांची फेरछपाई करायला लावली. जतच्या यल्लमा यात्रेनिमित्त आजपासून सुरू झालेले प्रदर्शन २६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यांचे पडसाद सभेत उमटले. झेडपीच्या पदर्शन भाजपच्या नेत्यांनी हायजॅक केल्याचा सूर आहे.  

सूर्यकांत मुठेकर यांनी हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेता कृषी प्रदर्शन आपल्याच निधीतून घेणे हा आपला अपमान आहे. प्रदर्शनाच्या तयारीबाबत आयोजकांनी कोणतीच चर्चा केलेली नाही. तालुक्‍यात गावोगावी मोठ-मोठी पोस्टर्सवर झेडपी किंवा आर. आर. पाटील यांच्या स्मृतीबाबत साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही.’’ कल्पना सावंत व सभापती भाऊसाहेब पाटील म्हणाले, ‘‘आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांना निमंत्रणही देण्यात आले नाही.’’ राजेंद्र माळी म्हणाले, की अशा प्रदर्शनाला स्वीय निधीच देऊ नका.’’ त्याला बहुतांश सदस्यांनी पाठिंबा दिला. सुरेश मोहिते, बसवराज पाटील, प्रकाश कांबळे, प्रकाश देसाई हेही निधी न देण्यावर ठाम होते. कृषी विकास अधिकारी रघुनाथ भोसले यांनीही आपणाला विश्‍वासात न घेतल्याचे सांगितले. सम्राट महाडिक यांनी सभापती सावंत यांच्या पदाचा राजीनामा मागितला. सभापती रवींद्र बर्डे यांनी असे प्रदर्शन सांगलीतच भरवावे, अशी सूचना केली. छाया खरमाटे यांनी प्रदर्शन कोणी कुठे कसे भरवावे, त्यांच्यावर वैयक्तिक टीकेऐवजी धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे सूचवले. निधी देत नसताना अन्य बाबींवर टीका टाळण्याचे आवाहन केले.

निमंत्रण पत्रिकेवरून मी तातडीने अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याचे आवाहन केले. मात्र, सदस्यांच्या भावनांचा विचार करून या प्रदर्शनाचा निधी रोखला जाईल. प्रदर्शनावर बहिष्कारही टाकू; शिवाय हे प्रदर्शन जिल्हास्तरावरच होईल. 
- स्नेहल पाटील, जि. प. अध्यक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com