जतसाठी कर्नाटकात कालवा खोदा

अजित झळके
शुक्रवार, 17 मे 2019

सांगली - जत तालुक्‍यासाठी कर्नाटक राज्यातील तुबची (जि. विजापूर) गावातून कृष्णा नदीचे पाणी हवे असल्यास महाराष्ट्र सरकारने  स्वतः कर्नाटकात कालवा खोदावा, येथे स्वतःची उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी, असा अजब प्रस्ताव कर्नाटक सरकारने दिला आहे. त्यांची तुबची - बबलेश्‍वर उपसा सिंचन योजना वापरून जत तालुक्‍यातील गावांना पाणी देण्यास असमर्थता दर्शविण्यासाठी हा अजब सल्ला देण्यात आला. त्याला महाराष्ट्र सरकारने तत्काळ नकार कळविला आहे.

सांगली - जत तालुक्‍यासाठी कर्नाटक राज्यातील तुबची (जि. विजापूर) गावातून कृष्णा नदीचे पाणी हवे असल्यास महाराष्ट्र सरकारने  स्वतः कर्नाटकात कालवा खोदावा, येथे स्वतःची उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी, असा अजब प्रस्ताव कर्नाटक सरकारने दिला आहे. त्यांची तुबची - बबलेश्‍वर उपसा सिंचन योजना वापरून जत तालुक्‍यातील गावांना पाणी देण्यास असमर्थता दर्शविण्यासाठी हा अजब सल्ला देण्यात आला. त्याला महाराष्ट्र सरकारने तत्काळ नकार कळविला आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले यांनी या माहितीला दुजोरा दिला. जतच्या पूर्व भागातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारची योजना तयार आहे, कर्नाटकच्या हद्दीत वेगळी योजना करण्याची गरज नाही. आम्ही आमची योजना आमच्या हद्दीत करू. कोयना धरणातून उत्तर कर्नाटकसाठी पाणी हवे असेल तर आधी कायदेशीर करार करा. त्याचा मसुदा पाठवण्यात आला आहे. तो मान्य नसेल तर कोयनेतून पाणी सोडणार नाही, अशी परखड भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. 

कृष्णा नदीची महाराष्ट्राची हद्द असलेल्या राजापूर बंधाऱ्यापासून सुमारे चाळीस किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकात गहजब माजला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नदी पात्रात विहिरी खोदल्या आहेत. अशावेळी महाराष्ट्राने कोयना धरणातून चार ते पाच टीएमसी पाणी विकत द्यावे, अशी मागणी कर्नाटक सरकारने केली आहे.

महाराष्ट्राने पाणी देतो, मात्र पाण्याच्या बदल्यात पाणी द्या. उन्हाळ्यात पाणी घ्या आणि पावसाळ्यात तुबची-बबलेश्‍वर योजनेतून जत तालुक्‍याच्या पूर्व भागातील तलाव भरून घेण्यासाठी पाणी द्या, असा प्रस्ताव दिला आहे. त्याला नकारघंटा वाजवताना ‘कर्नाटक खरिपात पाणी देऊ शकत नाही  आणि रब्बीत पाणी पुरत नाही’, अशी अजब भूमिका घेतली आहे. तुबची गावातून पाणी उचला, मात्र त्यासाठी समांतर योजना राबवा, असा सल्ला कर्नाटकच्या जलसंपदा विभागाने दिला आहे. त्यामुळे हा विषय चांगलाच ताणला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

चार टीएमसी शक्‍य, पण...
कोयना धरणात सध्या सुमारे २५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांना सुमारे सात टीएमसी इतके पाणी लागेल. नदीकाठच्या शेतीसाठी सुमारे दोन टीएमसी  पाण्याचा उपसा होईल. त्यामुळे कर्नाटकला चार टीएमसी पाणी देणे शक्‍य असल्याचा निर्वाळा अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले यांनी दिला. पण, आधी कायदेशीर करार, तोंडी काहीही नको, अशी भूमिका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

भौगोलिक स्थिती ?
तुबची बबलेश्‍वर योजनेतून तिकोटापर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेपासून तीन किलोमीटरवर पाणी आले. मूळ योजना असलेले तुबची गाव जतच्या  हद्दीपासून ५२ किलोमीटर अंतरावर आहे. कर्नाटकची भूमिका तीन किलोमीटरवरून पाणी देणार नाही, ५२ किलोमीटरवर कालवा खोदा, अशी आहे. पण, नैसर्गिक उतारामुळे तिकडून पाणी आणणे सोयीस्कर असल्याने महाराष्ट्र आग्रही आहे. अन्यथा, म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीनमधून बंदिस्त पाईपने पाणी नेण्याचा प्रस्ताव तयार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for Jat dug the Canal in Karnataka