घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

जत पालिकेत झेरॉक्‍स मशीन खरेदीत घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या कारभाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची गरज आहे. वास्तविक, अशा कारभारावर नगरसेवकांची करडी नजर पाहिजे. मात्र, "सब बाट के खावो' असा प्रकार घडू नये, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. 

जत पालिकेत झेरॉक्‍स मशीन खरेदीत घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या कारभाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची गरज आहे. वास्तविक, अशा कारभारावर नगरसेवकांची करडी नजर पाहिजे. मात्र, "सब बाट के खावो' असा प्रकार घडू नये, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. 

मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करा 
तत्कालीन मुख्याधिकारी सौ. पल्लवी पाटील यांच्याकडे कार्यभार असताना अनेक गैरव्यवहार झाले आहेत. या सगळ्याचीच चौकशी होणे गरजेचे आहे. कामाचे टेंडर असो वा साहित्याची खरेदी करण्याआधी नगरसेवकांच्या बैठकीत चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, असा एकही प्रकार त्यांच्या काळात झाला नाही. झेरॉक्‍स मशीन खरेदीचा विषयही सभागृहापुढे आणला गेला नाही. नगराध्यक्ष व ठरावीक नगरसेवकांना हाताशी धरून असे प्रकार झाले आहेत. याची चौकशी करणे आवश्‍यक आहे.  
- मोहन ऊर्फ भैया कुलकर्णी, नगरसेवक. 

पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा उघड  
नगरपालिकेच्या कारभाऱ्यांचा खरा चेहरा आता स्पष्ट होऊ लागला आहे. निधीची कमतरता असल्याचे सांगून मूलभूत विकासाला खीळ घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. उत्पन्न वाढीसाठी कोणतीच पावले उचलली जात नाहीत. मात्र, अनावश्‍यक खर्च रासरोसपणे सुरू आहे. याचा अहवाल पालिकेने जनतेसमोर ठेवावा. तरच अशा प्रकारांना खीळ बसेल.  
- संतोष कोळी, जत 

पाच वर्षांच्या कामाची चौकशी करा  
पालिकेतील कारभाऱ्यांची अवस्था "तुझं माझं जमेना... तुझ्या वाचून करमेना' अशी झाली आहे. विरोधक चेहराच नसल्याने सगळा कारभार खेळीमेळीत केला जात आहे. वास्तविक, जनतेकडून सारा वसूल करताना पाच पैशाची सूट दिली जात नाही. येथे मात्र अनेक गैरव्यवहार केले जात आहेत. जनतेच्या पैशाच्या सुरू असलेल्या लुटीवर लगाम घालायलाच हवा. गेल्या पाच वर्षांत झालेल्या सगळ्याच कामांची चौकशी करा.  - अविनाश वाघमारे, अध्यक्ष - डीपीआय 

काटकसरीच्या नावाखाली उधळपट्टी  
शहराचा विकास होण्यासाठी नगरपालिका झाली. मात्र, पहिल्याच कारभाऱ्यांनी शहराची अवस्था भकास केली आहे. पालिकेला चांगले अधिकारीही लाभले नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल. काटकसरीच्या नावाखाली एकप्रकारे उधळपट्टी होत आहे. कारभाऱ्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर येत आहे. झेरॉक्‍स मशीन खरेदीत घोटाळा करून कारभाऱ्यांनी जनतेवर अन्याय केला आहे. यासह आजवर खरेदी केलेल्या सगळ्याच साहित्य खरेदीची चौकशी व्हावी.  
- विजय ताड, युवक नेते, भाजप

Web Title: jat news Xerox machine scandal