कावीळ, टाईफाईडच्या रुग्णांत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

कोल्हापूर - पावसाळी वातावरणामुळे बालकांना विविध आजारांची लक्षणे दिसत आहेत. यात कावीळ व टाईफाईडच्या रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पंधरा दिवसात सीपीआर व सेवा रुग्णालयात २५० हून अधिक बालकांवर उपचार झाले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात जवळपास दुप्पट संख्येने बालरुग्ण उपचारासाठी येत आहेत, यात पाणी उकळून पिणे व संसर्गापासून दूर राहण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञाकंडून व्यक्त होत आहे. 

कोल्हापूर - पावसाळी वातावरणामुळे बालकांना विविध आजारांची लक्षणे दिसत आहेत. यात कावीळ व टाईफाईडच्या रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पंधरा दिवसात सीपीआर व सेवा रुग्णालयात २५० हून अधिक बालकांवर उपचार झाले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात जवळपास दुप्पट संख्येने बालरुग्ण उपचारासाठी येत आहेत, यात पाणी उकळून पिणे व संसर्गापासून दूर राहण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञाकंडून व्यक्त होत आहे. 

पावसाळा आला की, नद्या-नाल्यांना पूर येतो, पुरामुळे गाळ वाहून येतो. पाणी दूषित होते; तर कधी जुन्या टाकीतील साठवलेली अशुद्ध पाणी पोटात गेले तर तिथून जंतू संसर्गाला सुरुवात होते हा दरवर्षीचा अनुभव आहे. 

यंदाही दूषित पाण्यामुळे होणाऱ्या विकारात काविळीचे रुग्ण वाढू लागल्याचे ठळक दिसत आहे. यात बालकांना कावीळ, टाईफाईड, डायरीयासदृश विकाराची लक्षणे दिसत आहेत. कावीळमध्ये पोटफुगी, उलटी होणे, मळमळ होणे, भूक मंदावणे, डोळे पिवळसर होणे अशी प्राथमिक लक्षणे दिसतात तर टाईफाईडमध्ये सतत ताप, अंगदुखी, थंडी अशी सर्रास लक्षणे दिसत आहेत. 

सीपीआर रुग्णालयात उन्हाळ्यामध्ये दिवसाला सात-आठ मुले काविळीची लक्षणे दिसणारी मुले उपचारासाठी येत होती सध्या हे प्रमाण १५ ते २० मुलांवर पोहोचले आहे. यातही कावीळ लक्षण असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. 

आजारांची लक्षणे सुरू होताच पहिल्या दोन-तीन दिवसांत तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार करून घेतले तरी पाच-सहा दिवसांत आजार आटोक्‍यात येतो. मात्र सुरुवातीला काही दिवस अंगावर काढले तरी लक्षणे तीव्र होऊन बरे होण्याचा कालावधी वाढतो. अशात ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे, अशांना ॲडमिट करून उपचार करावे लागतात अशी स्थिती आहे.

शहरातील सीपीआर रुग्णालय, लाईन बाजारातील सेवा रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांत जवळपास २५० हून अधिक बालकांवर उपचार झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.  

 डॉ. एस. एच. सरवदे ः बालरोग तज्ञ (सीपीआर) 
‘‘कावीळ व टाईफाईडची लागण झालेले बाल रुग्ण वाढले आहेत. अशात थंडी, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसतात. त्यातून संसर्ग होण्याची शक्‍यता असते. शाळांतील अनेक मुले एकाच वर्गात असतात किंवा अन्य गर्दीच्या ठिकाणी अस्वच्छ वातावरण असते. तिथे संसर्गची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे सर्दी-खोकला, तापाची लक्षणे दिसताच उपचार तातडीने घेणे आवश्‍यक आहे. तसेच डासांची संख्या वाढणार नाही याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.’’ 
 
डॉ. अशोक पाटील, कावळा नाका (खासगी क्‍लिनिक)
‘‘गेल्या पंधरा दिवसांपासून बालरुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यात कावीळ, टाईफाईड, डायरिया अशी लक्षणे ठळक दिसतात. गरम पाणी पिणे हाच खबरदारीचा उपाय आहे; तर डास होणार नाहीत यासाठी परिसर व घर स्वच्छ ठेवणे व लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार करून घ्यावेत. आवश्‍यक तेथे चाचण्याही त्वरित करून घ्याव्यात.’’

Web Title: Jaundice typhoid patients increase in kolhapur

टॅग्स