जवान म्हणाला, आमची गाडी उडवली अन् तेवढ्यात फोन कट झाला

Pulwama
Pulwama

कोरेगाव : पाच वर्षांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातून बचावलेल्या सुशांत वीर या जवानाने पुलवामा येथून आमची गाडी उडवली आहे, असा फोन रुई (ता. कोरेगाव) या जन्मगावी केला अन्‌ तेवढ्यात फोन कट झाला. तसा सुशांतच्या आई जयश्री यांच्या काळजाचा ठोका चुकला. तेव्हापासून सुमारे 200 आजी- माजी सैनिक असलेले रुई गाव काळजीत पडले आहेत. दहशतवाद्यांच्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यात जखमी झालेल्या जवान सुशांत आणि त्यांच्या सर्व सहकारी जवानांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सारा गाव प्रार्थना करत आहे. 

शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन असले, तरी अपुऱ्या पावसामुळे त्यावर मर्यादा आल्याने रुई गावात लष्करी परंपरा सुरू झाली आहे. गावातील सुमारे सव्वाशे जवान सध्या सैन्य दलात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचबरोबर 50 पेक्षा अधिक निवृत्त झालेले जवान सध्या गावात आहेत. याच गावातील प्रमोद काशिनाथ वीर यांची तिन्ही मुले सध्या लष्करी सेवेत आहेत. त्यापैकी प्रवीण आर्टिलरीमध्ये, प्रशांत आर्मी सप्लाय कोरमध्ये, तर सुशांत सीआरपीएफमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रवीण आणि सुशांत दोघेही सुटीवर आले होते. सुटी संपल्यानंतर दोघेही गेल्या नऊ तारखेला पुन्हा आपापल्या कर्तव्यावर रुजू झाले. 

दरम्यान, गुरुवारी दुपारी पुलवामा येथून सुशांत यांनी रुई येथील घरी फोन केला. आमची गाडी उडवली आहे, एवढे बोलून होताच त्यांचा फोन कट झाला आणि त्यांच्या आई जयश्री यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच दरम्यान पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केल्याच्या बातम्या विविध वाहिन्यांवर सुरू झाल्याने सारा गाव काळजीत पडला. त्यानंतर जयश्री यांनी प्रवीण यांना फोनवरून माहिती दिली. प्रवीण यांनी खातरजमा करून घेतली असता सुशांत जखमी झाल्याचे व त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे समजले. प्रवीण यांनी ही माहिती पुन्हा आई जयश्री यांना कळवली आणि काळजी करू नको, असे सांगितले. मात्र, जयश्री या आई असल्याने त्यांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. त्याला कारणही तसेच होते. पाच वर्षांपूर्वी सुशांत छत्तीसगडमध्ये कार्यरत असताना नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातूनही बचावले होते. त्यावेळी त्यांच्या पायाला गोळी लागली होती. ही माहिती आई जयश्री यांच्यापासून लपवण्यात आली होती. 

तब्बल दोन महिन्यांनी गावात कुजबुज सुरू झाल्यामुळेच सुशांत जखमी असल्याचे जयश्री यांना समजले होते. त्यानंतर त्यांनी सुशांत यांना भेटण्यासाठी तडक हैदराबाद येथील लष्कराचे रुग्णालय गाठले होते. पूर्वीचा हा प्रसंग आठवल्याने आई जयश्री, वडील प्रमोद, आजी सावित्रीबाई, सुशांत यांच्या पत्नी स्नेहल, तसेच मुली संस्कृती, संहिता यांच्यासह घरातील सारेच काळजीत होते. सुशांत यांचे चुलत भाऊ रणजित हे देखील सैन्य दलात आहेत. ते सध्या सुटीवर गावी रुई येथे आले आहेत. त्यांचे व सुशांत यांचे कालच फोनवर बोलणे झाले होते. त्यामुळे रणजित घरातील सर्वांना धीर देत होते. अखेर आज सकाळी सुशांत व आई जयश्री यांच्यात फोनवर पुन्हा बोलणे झाले. मात्र, प्रत्यक्ष सुशांतला पाहात नाही, तोवर बरे वाटणार नाही, असा जयश्री यांचा काळजीचा स्वर आजही आहे. 

दरम्यान, पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांना आज रुई ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली. जखमी झालेल्या सुशांत व त्यांच्या सर्व सहकारी जवानांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी गावातील मारुती मंदिरात आज अबालवृद्ध ग्रामस्थांनी प्रार्थना केली. या ठिकाणी देवाला अभिषेकही घालण्यात आला. "भारत माता की जय,' अशा घोषणांनी गाव दुमदुमून गेला होता. 

उदयनराजेंकडून विमानाचे तिकीट 
जखमी जवान सुशांत यांना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यास श्रीनगरला जाता यावे, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी विमानाचे परतीचे तिकीट उपलब्ध करून देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तसा फोन उदयनराजे यांच्यामार्फत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आल्याची माहिती सुशांत यांचे चुलत भाऊ व जवान रणजित वीर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com