भाडळे खोऱ्यातून स्थलांतर सुरू

राजेंद्र वाघ
गुरुवार, 24 जानेवारी 2019

कोरेगाव - दुष्काळामुळे तालुक्‍याच्या पूर्वेकडील भाडळे खोऱ्यातील चार-पाच गावांमध्ये लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न गंभीर बनू लागला आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बीमध्येही या परिसरातील बरेचसे क्षेत्र नापेर राहिले, तर काहींनी परतीच्या पावसाच्या आशेवर पेरणी केलेल्या ज्वारीचे आता बाटूक झाले आहे. टॅंकरच्या पाण्यावर सध्या अवलंबून असलेल्या या भागामध्ये आता रेशनवर धान्य मिळावे, अशी मागणी होऊ लागली आहे, तर काहींनी चरितार्थासाठी स्थलांतरास सुरवात केल्याचे विदारक चित्र या परिसरात दिसू लागले आहे.

भाडळेसह या खोऱ्यातील धनगरवाडी, चिलेवाडी, बोधेवाडी, हासेवाडी, नागेवाडी या गावांमध्ये दुष्काळाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पुरेशा पावसाअभावी या भागातील खरीप हंगाम वाया गेला होता. चिलेवाडी येथे तर गेल्या काही महिन्यांपासून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. भाडळे, धनगरवाडी, हासेवाडी येथेही टॅंकर सुरू आहे. बोधेवाडी येथे एक दिवसाआड टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. नागेवाडी येथे अधिग्रहण केलेल्या विहिरीचे पाणी संपुष्टात आल्याने या गावालाही आता टॅंकरशिवाय पर्याय उरला नाही.

अनभुलेवाडी, भंडारमाची या गावांचे टॅंकरचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी या परिसरामध्ये रब्बीतील बरचसे क्षेत्र नापेर राहिले आहे. काहींनी परतीच्या पावसाच्या आशेवर ज्वारीची पेरणी केली; परंतु परतीचा पाऊसच न झाल्याने ज्वारीचे आता बाटूक झाले आहे. शेतातील ज्वारी या वर्षी घरी येणार नसल्याने खायचे काय? असा प्रश्‍न आ वासून उभा राहिल्याने रेशनवर धान्य मिळावे, अशी मागणी नागेवाडीच्या काही ग्रामस्थांनी सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्याकडे केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. जगदाळे यांनी याप्रश्‍नी फोनद्वारे तहसीलदारांशी चर्चा केली. त्यावर येत्या २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभांमधून रेशनवर धान्य मिळण्याबाबतचे ठराव संबंधित गावांनी करण्याबाबतचा पर्याय प्रशासनाने सुचविला आहे. दरम्यान, गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील काही लोकांनी चरितार्थासाठी स्थलांतर सुरू केले असून, त्यापैकी काही जण कामाच्या शोधात भिवंडी येथे जाऊन पोचले आहेत.

उत्तर भागातही टॅंकर
वाठार स्टेशन येथे सध्या टॅंकर सुरू आहे. जगतापनगर, मोरबेंद येथील टॅंकरचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. नायगाव, नांदवळ येथेही टॅंकरची मागणी असून, भविष्यात टॅंकरग्रस्त गावे वाढणार आहेत.    

Web Title: Jawar Loss Drought People Migration