कुछ मिठा हो जाए: जयंत पाटलांकडून सदाभाऊंना कॅडबरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sadabhau khot- Jayant Patil

कुछ मिठा हो जाए: जयंत पाटलांकडून सदाभाऊंना कॅडबरी

इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील आणि रयत क्रांतीचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत हे कट्टर विरोधक आज इस्लामपूर नगरपालिकेच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. जयंतरावांनी सदाभाऊंना कॅडबरी भरवली आणि कटूता दूर करत ‘कुछ मिठा हो जाए’चा संदेश पेरला. 

जयंतरावांनी याच व्यासपीठावरून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे नाव न घेता ‘पृथ्वीवर नसतील तितके आजार गेल्या पाच वर्षाच्या सत्तेत झाले’, अशी तोफ डागली. शहरातील नागरिकांना घरटी वीस हजार रुपये आरोग्याच्या खर्चासाठी मोजावे लागले, असल्याची टीका त्यांनी सदाभाऊंच्या उपस्थितीत केली. 

नगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, पंपिंग स्टेशन व ड्रेनेज नेटवर्क कामाचा शुभारंभ आज मंत्री पाटील, आमदार खोत आणि खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत झाला. जयंत पाटील म्हणाले, ‘एसटीपीच्या जागा ताब्यात असल्याशिवाय काम करू नका असे सांगूनही काम सुरू केल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. रस्त्यांमुळे लोकांचे हाल झाले. पृथ्वीवरील सर्व साथीच्या आजारांचा सामना करावा लागला. हा काळ नागरिक कधीही विसरणार नाहीत. तत्कालीन शासनाच्या अचानक आलेल्या आदेशाने दोन वर्षे काम बंद राहिले. जुनी योजना २०३० सालपर्यंत पुरेल अशी होती, त्यातही अनेक दुरूस्तीची कामे निघालीत. तो व शहराला अतिरिक्त लागणाऱ्या पाण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेने द्यावा, शासनामार्फत त्यासाठी निधी मिळवून देऊ."

सदाभाऊ खोत म्हणाले, ‘‘मी आणि जयंतराव व्यासपीठावर एकत्र आल्याच्या चर्चा होतील, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकास महत्त्वाचा आहे. राजकारण करायला अन्य बरेच विषय आहेत. मी मंत्री असताना या योजनेला चालना दिली होती. यापुढेही विकासासाठी आमची एकोप्याचीच भूमिका राहिल. विकासाला चालना हेच आमचे सूत्र आहे. युवकांना रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक स्थैर्य देण्याला नेहमीच प्राधान्य राहिले आहे.’’

खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘‘या योजनेला सोलर बसवता आल्यास उत्पन्नाचे साधन मिळेल. पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याकडे राज्य शासनाने पाहावे. या योजनेमुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहील.’’

यावेळी प्रकल्पाला जागा देणाऱ्या धीरज कांबळे, विजय डोंगरे, विनय डोंगरे, मंगला डोंगरे आदींचा सत्कार झाला. दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेश वाटप झाले. अरुणादेवी पाटील, खंडेराव जाधव, चिमन डांगे, शहाजी पाटील, सुनीता सपकाळ, विश्वास डांगे, बशीर मुल्ला, प्रांत संपत खिलारी, तहसीलदार प्रदीप उबाळे उपस्थित होते. मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी प्रास्ताविक केले. रमेश पाटील यांनी आभार मानले.

सदाभाऊ, जेवायला बोलवा!

जयंतरावांनी शहरातील परिस्थिती मांडताना अचानक सदाभाऊंकडे मोर्चा वळवला. ‘तुम्ही तिकडे वरती राहता, आम्हाला जेवायला केव्हा बोलावताय. जेवण राहु द्या, किमान चहा-पाण्याला बोलवा. आम्ही येताना सोबत खासदारांना आणतो, कारण मागच्यावेळी तुम्ही त्यांचा प्रचार केला होता.’’ असे म्हणताच हशा पिकला. व्यासपीठावर जयंत पाटील यांनी सदभाऊंना कॅडबरी खायला दिली. शिवाय आधी भाषणासाठीही आग्रह केला. दोघांच्यात खेळीमेळीचे वातावरण होते.

Web Title: Jayant Aptil Sadabhau Khot Catberry Sweet Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..