जयंत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

आष्टा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिगाव ( ता. वाळवा) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमवेत बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी गृहमंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर आज आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या बाबतची फिर्याद सहायक पोलिस फौजदार संजय सनदी यांनी आष्टा पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस चौकशीत बेकायदा जमाव जमवल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला. 

आष्टा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिगाव ( ता. वाळवा) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमवेत बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी गृहमंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर आज आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या बाबतची फिर्याद सहायक पोलिस फौजदार संजय सनदी यांनी आष्टा पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस चौकशीत बेकायदा जमाव जमवल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला. 

या बाबतची माहिती अशी ः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बागणी मतदारसंघात रयत विकास आघाडीकडून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत, राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे, अपक्ष उमेदवार संभाजी कचरे यांच्यासह अनेकांची उमेदवारी होती. 21 फेब्रुवारीला मतदान होते. 20 फेब्रुवारीला रात्री 9 च्या सुमारास सागर खोत यांना मते द्यावीत, याकरिता इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी शिगाव येथे मतदारांना आमिष दाखवून पैशाचे वाटप केल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीचे मधुकर पाटील यांनी आष्टा पोलिसात निशिकांत पाटील यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शिगाव येथील चौकात जमून जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग केला होता. मध्यरात्रीपर्यंत चौकात ठिय्या मारला होता. निशिकांत पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला होता. याच प्रकारावरून बेकायदेशीर जमाव जमवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंदी आदेशाचा भंग केला म्हणून सहायक पोलिस फौजदार संजय सनदी यांनी स्वरूपराव बाळकृष्ण पाटील, मधुकर रंगराव पाटील, रणजित दत्तात्रय पाटील, शरद पांडुरंग गायकवाड, राजेंद्र केशव भासर, जितेंद्र बाबासाहेब पाटील व अनोळखी दहा ते बारा जणांविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. वरील सर्वांच्यावर कारवाई झाली होती. पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास सावंत तपास करीत होते. पोलिस तपासात जयंत पाटील यांचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार साक्षीदारांच्या साक्षी घेऊन सावंत यांनी पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया केली आहे. या बाबत सावंत म्हणाले, ""या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासात जयंत पाटील यांचे नाव निष्पन्न झाले आहे. त्यानुसार कारवाई करीत आहोत.'' 

"" शिगाव प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने आमदार जयंत पाटील यांच्या दहशतीच्या राजकारणाला ब्रेक लागेल. निवडणुकीत जनतेने त्यांना मताच्या रूपाने बाजूला केलेच आहे; आता त्यांच्या दहशतीलाही आळा बसेल.'' 
- सम्राट महाडिक, जिल्हा परिषद सदस्य 

"" शिगावच्या प्रकरणात बेकायदेशीररीत्या कृत्य केल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करून निवडणूक आयोगाने न्यायाची भूमिका घेतली आहे.'' 
- निशिकांत पाटील, नगराध्यक्ष, इस्लामपूर 

"" आमदार जयंत पाटील यांच्यावर शिगाव येथील प्रकरणात याआधीच गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासात त्यांचे नाव निष्पन्न झाल्याने पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया केली जाईल.'' 
- जहॉंगीर शेख, पोलिस उपनिरीक्षक, आष्टा पोलिस ठाणे 

Web Title: Jayant Patil against crime