जयंत पाटील, राजू शेट्टींची स्तुतिसुमने !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

इस्लामपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  खासदार राजू शेट्टी हे दोन नेते प्रथमच इस्लामपूर येथील जैन मंदिरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र  आले.

दोघांनीही या कार्यक्रमात एकमेकांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. यावेळी व्यासपीठावर  १००८ चंद्रप्रभूसागर महाराज, काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस ॲड. मनीषा रोटे, विजय राजमाने होते.

इस्लामपूर येथील अहिंसा उद्यान, चारुकीर्ती भवन व चंद्रप्रभू मंदिर येथे बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्‌घाटन चंद्रप्रभू सागर महाराज, आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार पाटील म्हणाले, ‘‘खासदरसाहेब मी आलो, तेव्हा एवढ्या जोरात वाद्ये वाजली नाहीत, मात्र तुम्ही आल्यावर जोरात ती वाजली. त्याचे कारण आधी लोकसभा व नंतर विधानसभा आहे,  हे असावे. यावेळी एकच हशा झाला. त्यांनी शेट्टी यांचा लोकप्रिय खासदार असाही उल्लेख केला.’’

यावेळी  पाटील यांच्याहस्ते शेट्टी यांचा सत्कार झाला, तसेच दोन्ही नेत्यांच्या हस्ते युवा मंचच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.

राजू शेट्टी म्हणाले,‘‘मी ठिकठिकाणच्या समाजाच्या कार्यक्रमांना जातो, मात्र येथील समाजबांधव मला बोलवायला घाबरायचे. आज बोलावले आहे म्हणजे तुम्ही (जयंत पाटील) परवानगी दिली आहे. येथील विकासकामात आपला निधी आहे. माझा काहीही वाटा नाही. तरीही मला बोलावण्याचा मनाचा मोठेपणा आपण दाखवला आहे. येथील विकासकामांना जयंतराव पाटील यांनी कधी निधी कमी पडू दिला नाही आणि कमी पडू देणारही नाहीत. मात्र मलाही सांगा, मीही निधी देईन. आम्ही साखर कारखान्यांच्याकडे ऊसदर मागितला, मात्र कारखाने मोडून टाका, असे कधी म्हणालो नाही. कारण कारखाने मोडून पडले; तर पुढच्या वर्षी ऊस कुठे घालणार? सत्याचा आग्रह धरणे हा आमचा स्वभाव आहे, तो आम्ही कायम ठेवू.’’

चंद्रप्रभू सागर महाराज यांनीही दोन्ही नेत्यांचे कौतुक केले. ते म्हणाले,‘‘या ठिकाणी देणारे साखर कारखानदार, मागणारे संघटनावाले तर घेणारे शेतकरी एकत्र आले आहेत. या घटनेचा तुमच्या परिसरावर निश्‍चितपणे  चांगला परिणाम होईल.’’

राजारामबापू साखर  कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, बबन थोटे, युवकाध्यक्ष संग्राम पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सयाजी  मोरे, ॲड. समशुद्दीन संदे, भागवत जाधव, एल. एन. शहा, जिल्हा सत्र न्यायाधीश कल्पना होरे, अध्यक्ष विजय राजमाने, उपाध्यक्ष शीतल पत्रावळे, सचिव समीर करांडे उपस्थित होते.

Web Title: Jayant Patil and Raju Shetty On one platform