बड्या उद्योगपतीसाठी अवनी वाघिणीची हत्या - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

सांगली - एका बड्या उद्योगपतीच्या सिमेंट प्लॅन्टमधील अडथळा दूर करण्यासाठी नरभक्षक अवनी वाघिणीची हत्या केली असावी, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.

सांगली - एका बड्या उद्योगपतीच्या सिमेंट प्लॅन्टमधील अडथळा दूर करण्यासाठी नरभक्षक अवनी वाघिणीची हत्या केली असावी, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. देशातील आणि राज्यातील प्राणीमित्रांना तसे वाटत असल्याचे ते म्हणाले. आष्ट्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

जयंत पाटील म्हणाले, ‘‘अवनी वाघिणी आणि तिच्या दोन बछड्यांचा वावर असलेला भाग डोलोमाईट आणि चुनखडीसाठी प्रसिद्ध आहे. २०१२ मध्ये या भागात सिमेंट प्लॅन्ट सुरू करण्यासाठी एका उद्योगपतीने राज्य सरकारकडे अर्ज केला होता. तो तत्कालीन केंद्र सरकारकडे पाठवला. त्यावेळी हा भाग वनविभागाच्या अंतर्गत येत असल्याने त्यांच्या कायद्यानुसार कारवाई करावी, असे सरकारचे म्हणणे होते. त्यानंतर केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी या उद्योगपतीच्या कंपनीला ४६७ हेक्‍टर जमीन दिली. मात्र या कंपनीकडे प्लॅन्टसाठी आवश्‍यक असलेला ग्राईंडर नव्हता. तो बुटीबोरीमधील एका उद्योग कंपनीकडे होता. त्यामुळे त्या उद्योगपतीने ही कंपनीच या नव्या उद्योग समुहाला देऊन टाकली.

मात्र या भागात वाघिणीचा वावर असल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना तिची भिती होती. ती दूर करण्यासाठी सरकारने अवनी वाघिणीची हत्या केली असावी, असे देशभरातील आणि राज्यातील प्राणीमित्रांना वाटते.’’ सरकारने वाघिणीला गोळ्या घालण्यापेक्षा तिच्यावर ट्रॅंक्विलायझर डार्टचा उपयोग करुन तिला बेशुध्द करता आले असते, असेही श्री. पाटील म्हणाले.

Web Title: Jayant Patil comment