पवार यांच्या संमतीनेच डी. वाय. दादा राष्ट्रवादीत - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच डॉ. डी. वाय. पाटील यांनी पक्षात प्रवेश केला. डी. वाय. पाटील यांनी पक्षात येणे हे राष्ट्रवादीच्या हिताचेच आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जे नाराज आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करू, असे प्रतिपादन ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली. डी. वाय. पाटील यांचे पुत्र आमदार सतेज पाटील यांनी या प्रवेशाबाबत आश्‍चर्य व्यक्त करून सहकारी पक्षाने अंधारात ठेवल्याची खंतही व्यक्त केली. ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी प्रवेशाबाबत सूचक मौन बाळगले.

एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आलेल्या जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी डॉ. डी. वाय. पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली होती. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच डॉ. डी. वाय. पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काही जण नाराज असल्याचेही समजले आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करू.’’

आघाडीच्या जागावाटपाविषयी पाटील म्हणाले, ‘‘लोकसभेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जागावाटपाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर शरद पवार आणि राहुल गांधी यांची चर्चा सुरू असून, राज्यपातळीवर मी आणि अशोक चव्हाण जागावाटपाबद्दल चर्चा करीत आहोत. स्वाभिमानीचे राजू शेट्टी व अन्य घटक पक्षांना विश्‍वासात घेऊन मगच अंतिम निर्णय घेऊ. स्थानिक पातळीवरील नेत्यांचेही मत घेतले जाणार आहे.’’

आघाडी धर्म पाळावा
सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या वादावर पाटील म्हणाले, ‘‘स्थानिक कारणांमधून आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद, वाद असू शकतात. त्यांनी चर्चा करून ते सोडवावेत. निवडणुकीत असे वाद राहणार नाहीत, याची काळजी दोन्ही पक्ष घेतील. मात्र, दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आघाडी धर्म पाळला पाहिजे.’’

Web Title: Jayant Patil comment