...म्हणून काहींच्या पोटात गोळा उठला आहे; जयंत पाटलांचा उदयनराजेंना टोला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. त्यामुळे काहींच्या पोटात गोळा उठला आहे. काहींनी निवडणूक जाहीर होण्यासाठी भाजपच्या नेत्यांचे पाय धरण्याचे काम सुरू केले आहे. पण, बॅट हातात धरली म्हणून कोणी धोनी होत नाही. राष्ट्रवादीची साथ सोडणारा कधीही खासदार होणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

सातारा : विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. त्यामुळे काहींच्या पोटात गोळा उठला आहे. काहींनी निवडणूक जाहीर होण्यासाठी भाजपच्या नेत्यांचे पाय धरण्याचे काम सुरू केले आहे. पण, बॅट हातात धरली म्हणून कोणी धोनी होत नाही. राष्ट्रवादीची साथ सोडणारा कधीही खासदार होणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. साताऱ्यात आज (ता.22) झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांनी राजकीय व्यभिचार सुरू केला आहे. त्याला अनेकजण बळी पडले आहेत. असा प्रकार यापूर्वी राज्यात कधीच घडला नाही. लोकांना अडचणीत आणून त्यांना पक्षापुढे नतमस्तक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ खर्च केला. प्रत्येकाची वेळ येणार आहे. तुमच्या पक्षात सक्षम लोकांची कमी असल्यानेच दुसऱ्या पक्षांतील लोकांची गरज लागली आहे, असे स्पष्ट करून श्री. पाटील म्हणाले,"मागे लोकसभा निवडणुकीवेळी पक्षशिस्त न पाळणाऱ्यांना पक्षात घेऊ नका, असे मी सांगत होतो. कदाचित मी लहान होतो, माझे त्यांनी मनावर घेतले नाही.

भाजपप्रणित दोन राज्यांत जनादेश यात्रा भाजपने काढली होती. पण, तेथे भाजपचा पराभवच झाला होता. आता महाराष्ट्रात त्याची हॅट्ट्रिक होईल. साताऱ्यात राष्ट्रवादीला तरुणाईची ताकद मिळाली आहे. पाच वर्षांत वीज, खते, इंधन महागले. कॉंग्रेसच्या काळात तीन युद्धे होऊनही कधीही रिझर्व्ह बॅंकेकडील पैशाला सरकारने हात लावला नव्हता. पण, मोदींनी एक लाख 76 हजार कोटी रुपये रिझर्व्ह बॅंकेतून काढले आहेत. ते कशासाठी काढले, याची कारणेही त्यांना सांगता आली नाहीत. आर्थिक धोरणे चुकल्याने सध्या मंदी दारात उभी असून कंपन्या बंद पडत आहेत. भविष्यात आणखी गंभीर परिस्थिती होईल.'' 

संकटे आली की पवारसाहेब आठवतात. जिल्ह्यात पूर आला, त्यावेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत होते, तर शरद पवार हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले होते. 80 वर्षांचा तरुण सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. ही बाब काही तासांत मोदीपर्यंत पोचेल. मगच त्यांच्या लक्षात येईल की, महाराष्ट्र जिंकणे सोपे नाही. -जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant patil criticise on udayanraje bhonsale in satara