अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात जयंत पाटील यांचे व्याख्यान

धर्मवीर पाटील
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

इस्लामपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील अमेरिकेतील सुप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठात आणि सर्वात मोठ्या परिषदेत येत्या १६ व १७ फेब्रुवारीला सहभागी होत आहेत. सुमारे एक हजार विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील अभ्यासकांना ते भारतीय प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत.

इस्लामपूर - माजी अर्थ-गृह-ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील अमेरिकेतील सुप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठात आणि सर्वात मोठ्या परिषदेत येत्या १६ व १७ फेब्रुवारीला सहभागी होत आहेत. सुमारे एक हजार विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील अभ्यासकांना ते भारतीय प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत.

ग्रामपातळीवरील सभांपासून विधिमंडळ आणि आता थेट अमेरिका असा त्यांचा प्रवास महाराष्ट्र आणि इस्लामपूर मतदारसंघाचा गौरव अधोरेखित करणारा आहे. अमेरिकेत जाऊन भाषण देणाऱ्या भारतातील नामवंत वक्त्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे १६ फेब्रुवारीला त्यांचा ५७ वा वाढदिवस साजरा होत आहे. 

अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठात गेली काही वर्षे भारतीय पारिषदेचे आयोजन केले जाते. यात नामवंत-विचारवंत, अभ्यासकांना निमंत्रित केले जाते. जागतिक मान्यता असलेल्या या व्यासपीठावर भारतीय प्रश्नांवर चर्चा व वाद-संवाद होणार आहे. यंदा १६ वी वार्षिक भारतीय परिषद होत असून यासाठी आमदार जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

सध्या भारत कोणत्या वळणावर आहे? सद्यस्थिती काय आहे? यावर आमदार पाटील बोलणार आहेत. आजवर या परिषदेत रवी शंकर प्रसाद, केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल, अभिनेते कमल हसन, अमर्त्य सेन, सुगाता बोस, ओमर अब्दुल्लाह, एस. वाय. कुरेशी, विनोद रॉय, पत्रकार रवीश कुमार, अझीम प्रेमजी, शशी थरूर, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, पत्रकार रजत शर्मा, राकेश मोहन, पवन कल्याण, पिंकी आनंद आणि आर. माधवन यांच्यासारख्या दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले होते. 

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाला अभिमान वाटेल असे विधायक वाटचाल करणारे नेते म्हणून परिचित असलेले जयंतराव अमेरिकास्थित हॉर्वर्ड विद्यापीठात जागतिक स्तरावर चर्चा करण्यासाठी जात आहेत. महाराष्ट्र राज्याचा सलग ११ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. तसेच देशपातळीवर अनेक समस्यांवर देखील ते आपली भूमिका मांडत आहेत. ग्रामीण भागातील सभांमध्ये मृदू आणि उपरोधपूर्ण शैलीत ते जशी भाषणे करतात तसेच विधिमंडळ कामकाजात अत्यंत आक्रमक शैलीत विरोधकांवर तुटून पडतात. त्याचीच ही पोचपावती आहे.

Web Title: Jayant Patil lecture at Harvard University, USA