जयंतराव हरले; कॉंग्रेसने गड राखले 

अजित झळके
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

सांगली : जिल्ह्यात इस्लामपूर वगळता सर्वत्र प्रस्थापित नेत्यांनी आपापले गड राखले आहेत. पक्षीय बलाबलाच्या पातळीवर सांगायचे तर कॉंग्रेसने विटा, पलूस नगरपालिका तर कडेगाव, खानापूर या नगरपंचायतींवर झेंडा फडकविला.

सांगली : जिल्ह्यात इस्लामपूर वगळता सर्वत्र प्रस्थापित नेत्यांनी आपापले गड राखले आहेत. पक्षीय बलाबलाच्या पातळीवर सांगायचे तर कॉंग्रेसने विटा, पलूस नगरपालिका तर कडेगाव, खानापूर या नगरपंचायतींवर झेंडा फडकविला.

कॉंग्रेसने राष्ट्रवादीला मागे टाकत सर्वाधिक चांगली कामगिरी नोंदविली. विधान परिषदेपाठोपाठ पतंगराव कदमांनी पुन्हा आपले स्टार भक्‍कम असल्याचे सिद्ध केले. सदाशिवरावांची विट्यातील पाटीलकी कायम राहिली. तासगावमध्ये खासदार संजय पाटील यांनी सर्व ताकद पणाला लावत राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे आव्हान संपुष्टात आणत पहिल्यांदाच नगपालिकेत कमळ फुलवले आहे. कवठेमहांकाळमध्ये भाजपच्या भागिदारीत तर आष्ट्यात स्वबळावर राष्ट्रवादीने सत्ता प्रस्थापित केली. सर्वाधिक चर्चेत ठरलेल्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचाच 'कार्यक्रम' करत राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि त्यांच्या टीमने जोरदार यश मिळविले. 

देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र नावाची घंटा वाजत होती, ती स्थिती कायम आहे का, हे तपासून पाहण्याची पहिली मोठी परीक्षा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या रुपाने होऊ घातली होती. सहाजिकच दोन खासदार आणि पाच आमदार असलेल्या भाजप, सेना, स्वाभिमानीच्या नेत्यांवर आपण लाटेवरचे नेते नाही, हे सिद्ध करण्याचा नैतिक दबाव होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंसह सेनेच्या नेत्यांनी शाब्दिक तिजोऱ्या खोलून रसद पुरवली. भाजपला तासगावमध्ये स्वबळावर यश आले, तर इस्लामपूरमध्ये सत्तेतील घटकपक्ष म्हणून त्यांचा सहभाग राहिला. शिवसेना विट्यात भुईसपाट झाली असली तरी इस्लामपूरमध्ये तब्बल पाच जागा घेत भगवा फडकला. 

जयंतरावांनी आठ वर्षांपूर्वी सांगली महापालिकेत दिवंगत मदन पाटील यांचा 'कार्यक्रम' करण्यासाठी महाआघाडी नावाचा तंबू ठोकला होता. त्याची पुनरावृत्ती इस्लामपुरात विरोधकांनी जयंतरावांच्या विरोधात केली. घरचे मैदान शाबूत ठेवून जिल्हाभर खेळ्या करणाऱ्या जयंतरावांची घरातच दमछाक झाली. 'फितूर' नसतील तर जयंतरावांना रोखता येते, याचा आत्मविश्‍वास या निवडणुकीने जयंत विरोधकांना दिला. मंत्री सदाभाऊ खोत हीरो ठरले. भाजपसाठी आजचा दिवस सोनियाचा ठरला. कमळ चिन्हावर निवडणूक लढवून पालिकेवर झेंडा फडकवण्याची ऐतिहासिक कामगिरी संजयकाकांनी तासगावमध्ये फत्ते केली. हेलकावे खात का असेना त्यांची नौका सत्तेच्या धक्‍क्‍याला लागली. दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात राष्ट्रवादीने दिलेली लढत वाखाणण्यासारखी ठरली, मात्र कॉंग्रेस सोबत असती तर? हा प्रश्‍न तिथे दीर्घकाळ सलत राहील, असेच दिसते. 

इकडे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांची राज्यातील सत्तेत असूनदेखील निराशाजनक कामगिरी झाली. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या 'परफेक्‍ट प्लॅनिंग'ने सेनेला सपाटून मार खावा लागला. विट्याच्या गल्लीगल्लीत भाऊंच्या 'टोपी'ची जादू चालली. बाबर यांचे चिरंजीव अमोल केवळ 11 मतांनी विजयी झाले, इथेच त्यांचा शहरातील संपर्क अपुरा असल्याचे दाखले मिळतात. तिकडे कडेगावमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना पतंगरावांचे 'अवजड' आव्हान पुन्हा पेलवले नाही. त्यांना सात जागा मिळाल्या, मात्र भाजप नेत्यांची तिजोरी उघडी करून कोट्यवधीचा निधी देण्याची जादूई भाषा इथे चालली नाही. पलूस नगरपालिकेत विरोधकांच्या एकीलाही पतंगराव पुरून उरले. 

माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी 'मी कुठेही सूट होतो', हे पुन्हा सिद्ध करत आबा गटासोबत कवठेमहांकाळ नगरपंचायतीची सत्ता मिळवली. भाजपच्या 'तराजूत' ती मोजली जाणार की नाही, हा प्रश्‍न गौण असला तरी त्यांनी भाजपला केव्हाच ठेंगा दाखवला आहे. सांगली बाजार समितीत बट्ट्याबोळ झाल्यानंतर त्यांनी 'सरकारराज' चालवायला जागा मिळाली, हेही कमी नाही. शिवाय, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक नव्या राजकीय समीकरणाने ढवळून निघेल, असे धाडसी संकेत त्यांनी दिले. राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांच्यासाठी घोरपडे गटाशी हातमिळवणी फायद्याचा सौदा ठरला. खासदार पाटील यांनी इथे मिळवलेले यश 'प्लस' आहे. घोरपडेंना वगळून भाजपच्या स्वतंत्र गटाची बांधणी करण्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाल्याचे या निकालाने दाखवले. जिल्ह्यात जोरदार टशन सुरू असताना आष्ट्याच्या गढीवर विलासराव शिंदे शांत, निवांत लढत होते. त्यांचा तो आत्मविश्‍वास चुकीचा नव्हता, हे आष्टेकरांनी दाखवून दिले. अर्थात, त्यांच्या पत्नी व विद्यमान नगराध्यक्षा मंगला शिंदे यांचा पराभव करून लोकांनी 'आता पुरे', असा थेट सांगावा धाडला. खानापूर मतदारसंघात कॉंग्रेस अनिल बाबर गटासह सत्ता स्थापण्याच्या तयारीत आहे. 

नव्या आघाड्यांचे यश 
या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नव्या आघाड्या, युत्यांना जन्म दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ही समीकरणे नव्या रंगात दिसतील. कॉंग्रेसचा आत्मविश्‍वास उंचावणारी आणि राष्ट्रवादीसाठी धोक्‍याची घंटा वाजवणारी ही निवडणुकी ठरली. मोदी फटाका सगळीकडेच चालत नाही, असा शहाणपणाचा डोस भाजपला मिळाला तर ऐन वेळी डरकाळी फोडण्यापेक्षा पाच वर्षे घात लावावी लागते, असा धडा शिवसेनेने घेतला असेल, असे मानायला हरकत नाही. बघू, नवा डाव तोंडावर आहेच. 

मतदारांचा चाणाक्षपणा 
पाच नगरपालिका आणि तीन नगरपंचायतीच्या निकालांतून लोकांचा कल किती 'करेक्‍ट' असतो, याचे उदाहरण पाहायला मिळाले. एकाही ठिकाणी सत्ता एका पक्षाची आणि नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा, अशी स्थिती ओढवली नाही. मतदारांनी स्पष्ट कौल देत चोख कारभार करण्याचा संदेश यानिमित्ताने दिला आहे. संगीत खुर्ची टळल्याने नव्या कारभाऱ्यांवर शहराचा गाडा प्रभावीपणे चालविण्याची जबाबदारी आहे.

Web Title: Jayant Patil lost; Sanjay Patil in Tasgaon