राष्ट्रवादीमुळे मोहनरावांना निवडणूक महागात - जयंत पाटील

jayantpatil
jayantpatil

सांगली - कॉंग्रेसचे नेते पतंगराव कदम परिपक्व नेते, असा चिमटा घेत राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आज मोहनरावांना विधान परिषदेची निवडणूक महागात पडली असल्याचा टोला लगावला. त्यामुळेच ते सध्या भांबावले असून, राष्ट्रवादी तसेच माझ्यावर टीका करीत आहेत. आघाडीही होणार नसल्याचे त्यांनीच जाहीर केले आहे, मात्र काही झाले तरी आगामी झेडपी अध्यक्ष आमचाच असेल, असेही त्यांनी नमूद केले. 

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या रणनीती सुरू झाल्याचे सांगून आमदार पाटील म्हणाले, ""कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी कॉंग्रेस पक्ष राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणार नाही, असे जाहीर केले आहे. ते नव्याने मुंबईत गेल्याने भांबावून अशी भाषा वापरत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे त्यांना विधान परिषदेची निवडणूक महागात पडली आहे. एक हजार रुपयांचा सदरा पाच हजार रुपयांना महाग पडल्याने तो चांगला असूनही महाग पडल्याचे शल्य वाटत असावे. आम्ही कॉंग्रेस पक्षाकडे आघाडीचा प्रस्तावच घेऊन गेलो नसल्याने आघाडी नाकारण्याचा विषयच उपस्थित करण्याची आवश्‍यकता नाही. कॉंग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम परिपक्व नेते आहेत. त्यांना राज्य आणि केंद्रीय पातळीवरील राजकारणाची जाण आहे. राज्यात आघाडी पुढे न्यायचा, मतांचा विचार भावनिक करू नये. झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढवल्या जातील. राष्ट्रवादी पक्ष कोणाच्याही दावणीला बांधला जाणार नाही. स्थानिक नेत्यांशी चर्चा करून काही निर्णय होतील.'' 

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कदम राष्ट्रवादीची दखल घेण्याची गरज नाही, असे म्हणतात. मात्र, वाळव्यात आघाडीचे संकेत दिले जातात, यावर ते म्हणाले, ""राष्ट्रवादीची दखलच घ्यायची नसती तर वाळवा तालुक्‍यात सर्व पक्षांना एकत्रित येण्याची गरज का भासली? कॉंग्रेसनेही येथे स्वतंत्र लढण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी विरोधक जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या बदनामीची संधी सोडत नाहीत. याचाच अर्थ राष्ट्रवादीची ताकद कमी झालेली नाही. पलूस, कडेगाव दोन तालुके वगळता कॉंग्रेसचा प्रभाव जाणवत नाही. आर. आर. पाटील यांच्या पश्‍चातही आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिवावर लढणार आहे. आमची लढत राष्ट्रवादीसमोर असलेले पक्ष आणि त्या पक्षाच्या उमेदवारांबरोबर आहे.'' 

स्वाभिमानीच्या दोन नेत्यांतच मतभिन्नता.. 
आमदार जयंत पाटील म्हणाले, ""शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातही एकवाक्‍यता नाही. सत्ता आल्यानंतर भान सोडू नये. जमीन सोडू नये, अन्यथा सत्ता जाईल तेव्हा वाट लागते.'' 

घोरपडे यांच्याशी आघाडीबद्दल चर्चा नाही 
माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्याशी आघाडी केली जाणार आहे काय? या प्रश्‍नावर आमदार पाटील म्हणाले, ""अद्याप तरी यावर आमची चर्चा झाली नाही. मात्र मिरज पूर्व आरग, सोनी येथे विकास कामांच्या उद्‌घाटनास त्यांची माझ्याबरोबर उपस्थिती होती.' 

आमदार नाईकांचा अवमानच... 
आमदार पाटील म्हणाले, ""शिराळा येथे मुख्यमंत्र्यांनी झेडपीवर भाजपची सत्ता आली तरच मंत्रिपदासाठी आमदार शिवाजीराव नाईक यांचा विचार करू, असे स्पष्ट केले. हा आमदार नाईक यांचा एक प्रकारे अवमानच आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com