
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता एक वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथील जिल्हा परिषदेच्या घडामोडींत लक्ष घालते आहे.
सांगली ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता एक वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथील जिल्हा परिषदेच्या घडामोडींत लक्ष घालते आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद वाढवला आहे. काही नव्या योजना राबवण्याबाबत ते आग्रही आहेत. "मॉडेल शाळा' हा विषय या घडामोडींची सुरवात मानली जात आहे.
जिल्ह्यात प्रत्येक केंद्रात एक मॉडेल शाळा सुरु करण्याचा प्रयत्न राहील, अशी घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे. त्याबाबतचे नियोजन जिल्हा परिषदेने आधीच केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतील हा विषय आहे. त्यांनी शिक्षण आणि आरोग्य हाच मुख्य अजेंडा असेल, असे पदभार स्विकारताना सांगितले होते. त्याला जयंत पाटील यांनी थेट बळ दिले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन एक वर्ष झाले. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येऊन चार वर्षे व्हायला आली. या काळात जयंतरावांनी इकडे फार लक्ष दिले नाही. पावणेतीन वर्षानंतर अध्यक्ष बदल होतानाही त्यांनी फोडाफोडी टाळून भाजलाच सत्ता पुढे रेटण्याची संधी दिली. आताही पदाधिकारी बदल होणार असेल तर राष्ट्रवादी फार गडबड करणार नाही, असेच त्यांचे संकेत आहेत. त्याचवेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारात मात्र लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने त्यांनी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्याकडून घडामोडींची माहिती घेतली. त्यात काही सूचनाही दिल्या.
भाजपचे नेते शांतच आहेत. अधिकारी विरुद्ध कारभारी, असा संघर्ष पेटला आहे. अशावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यापैकी कुणीच अद्याप सदस्यांशी संवाद साधलेला नाही. या स्थितीत जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेत लक्ष घालण्याला फार महत्व आहे.
बरखास्ती अन् राजकारण
कायद्याच्या एका मुद्यावर जिल्हा परिषद बरखास्त करावी, असा प्रस्ताव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवारांनी तयार केला आहे. असा प्रस्ताव पुढे रेटणे सहाजिकच सीईओ डुडी यांच्यासाठी कठीण आव्हान आहे. त्याबाबत गुडेवार यांनी जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. जयंतराव त्याला होकार देतील, अशी शक्यता कमी आहे. परंतू, यानिमित्ताने जिल्हा परिषदेचे वातावरण मात्र ढवळून निघाले आहे.
संपादन : युवराज यादव