लोकसभेला शेट्टी विरुद्ध भाजपमध्ये लढत

लोकसभेला शेट्टी विरुद्ध भाजपमध्ये लढत

बदलते संदर्भ - विनय कोरे, सदाभाऊ खोत, सुरेशदादा की उल्हास पाटील याबाबत उत्‍सुकता

जयसिंगपूर - सत्तेतून बाहेर पडण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मुहूर्त मिळाल्यानंतर बदलत्या राजकीय संदर्भांवरून लोकसभा निवडणुकीची गणिते नव्याने मांडली जात आहेत. खासदार राजू शेट्टी विरुद्ध भाजप असाच संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

यंदाच्या ऊस हंगामातील दराच्या आंदोलनातून शेट्टी सरकारविरोधात आक्रमक होऊन पुन्हा एकदा आपले स्थान बळकट करण्यासाठी व्यूहरचना करू शकतात. शेट्टींविरोधात माजी मंत्री विनय कोरे, मंत्री सदाभाऊ खोत, सुरेशदादा पाटील अथवा आमदार उल्हास पाटील यापैकी एकाची उमेदवारी पुढे येऊ शकते. आमदार सुरेश हाळवणकर यांना मुंबईतच स्वारस्य असल्याने त्यांची उमेदवारी अनिश्‍चित मानली जात आहे. 

भाजपचे तत्कालीन मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे हे गॉडफादर राहिल्याने स्वाभिमानी आणि भाजपचे मनोमिलन झाले; मात्र त्यांच्यानंतर भाजपमध्ये स्वाभिमानीची फरफट झाल्याचे संदर्भ दिले जात आहेत.

सत्तेत गेल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नाही म्हणून सत्तेत गेल्यानंतरही खासदार शेट्टी यांची आंदोलनांनी पाठ सोडली नाही. सत्तेत असूनही दुर्लक्षित राहिल्याची खदखद त्यांना गेल्या अडीच वर्षांपासून होती, तर लोकसभा निवडणुकीत केवळ मोदी फॅक्‍टरमुळे शेट्टींचा विजय सोपा होऊनही शेट्टींनी मोदींविरोधात सातत्याने तोंडसुख घेतल्याचा आरोप भाजपकडून खासगीत झाले आहेत. 

मोदी आणि भाजपवर सातत्याने टीका केल्यानेच शेट्टी सत्तेत दुर्लक्षित राहिले. यातूनच त्यांनी सातत्याने सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा वेळोवेळी दिला होता. अखेर त्यांनी सत्तेला रामराम ठोकल्यानंतर आंदोलनातून पुन्हा एकदा करिष्मा दाखविण्यासाठी ते मोकळे झाले आहेत. भाजपने तीन वर्षांत लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघांतील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील इतर पक्षांतील नेत्यांना आपल्या सावलीत घेतले आहे. त्यामुळे आजमितीस तरी भाजप बलवान पक्ष म्हणून गणला जात आहे. या  बदलत्या पार्श्‍वभूमीवर खासदार शेट्टी यांच्यासमोर श्री. कोरे, मंत्री खोत, श्री. पाटील अथवा आमदार पाटील यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. भाजप-सेनेच्या युतीवरही अनेक संदर्भ बदलू शकतात. ‘व्होट बॅंक’ असणारे नेत्यांनी कार्यकर्त्यांसह भाजपचा उंबरठा ओलांडत असताना पक्षाला बळ देण्याची भूमिका घेतली आहे. याचेच मोठे आव्हान खासदार शेट्टींसमोर आहे. केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या हातीच आता शेट्टींचे भवितव्य अवलंबून आहे. 

खासदार शेट्टी व मंत्री खोत यांच्यातील दुराव्यामुळे स्वाभिमानीत उभी फूट पडली. त्यांची हकालपट्टी केल्यानंतर ना. खोत यांनीही खासदार शेट्टींना खुले आव्हान दिले आहे.

हाळवणकर पुन्हा विधानसभेच्या मैदानात?
भाजपच्या वाटेवर असणाऱ्या आवाडे गटामुळे हाळवणकर यांच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे आवाडेंच्या पक्षप्रवेशाला विरोध होऊ लागला आहे. आवाडेंच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयावरही काही संदर्भ बदलणार आहेत. आवाडेंचा पक्षप्रवेश झाल्यास श्रेष्ठींकडून हाळवणकर यांना लोकसभेवर पाठविले जाईल, असे अंदाज बांधले जात असले तरी भविष्यात राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी हाळवणकर समर्थकांचे प्रयत्न सुरू असल्यामुळे ते पुन्हा विधानसभेच्या मैदानातच उतरतील, अशी शक्‍यता आहे; मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यास ते शेट्टींविरोधात शड्डू ठोकू शकतात.

... तर शेट्टींना शिवसेनेचा पाठिंबा
भाजप आणि शिवसेनेतील मतभेदही चव्हाट्यावर आले असून स्वाभिमानीप्रमाणे सेनेनेही भाजपशी काडीमोड घेतली तर लोकसभेला सेनेचा शेट्टींना पाठिंबा मिळू शकतो. याआधीही शेट्टींना सेनेने पाठिंबा दिला होता. सेना-भाजपमधील वातावरण अालबेल राहिले तर मात्र शेट्टींना संघटनेचाच झेंडा खांद्यावर घ्यावा लागणार आहे. भाजपची संगत सोडल्याने सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही शेट्टींबद्दल सॉफ्ट कॉर्नर जाणवत असून भविष्यात हीदेखील एक नांदी ठरू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com