दरोडेखोरांच्या गोळीबारात सराफाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कोपरगाव - तालुक्‍यातील कोळपेवाडी येथे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास दरोडेखोऱ्यांच्या गोळीबारात एका सराफाचा मृत्यू झाला. श्‍याम सुभाष घाडगे (वय 36, रा. कोळपेवाडी) असे त्यांचे नाव आहे. या घटनेत मृत श्‍याम यांचे बंधू गणेश सुभाष घाडगे (वय 42) गंभीर जखमी झाले. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना नाशिकला हलविण्यात आले. दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला. 

कोळपेवाडी येथे आज आठवडेबाजार होता. तेथील मुख्य रस्त्यावर घाडगे बंधूंचे "लक्ष्मी ज्वेलर्स' नावाचे दुकान आहे. सध्या या दुकानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. कोणाला संशय येऊ नये, यासाठी फटाके वाजवित आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोर घाडगे यांच्या दुकानात आले. श्‍याम घाडगे यांचे वडील सुभाष यांना पिस्तूलाचा धाक दाखवून ऐवज लुटला. त्या वेळी तेथे आलेल्या श्‍याम व गणेश घाडगे यांच्यावर दरोडेखोरांनी गोळीबार केला. त्यात एक गोळी श्‍याम घाडगे यांच्या छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गणेश घाडगे यांच्या पोटात एक गोळी घुसली असून, एक गोळी छातीला चाटून गेली. शहरातील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नाशिकला हलविण्यात आले. दरोडेखोरांनी लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटून पोबारा केला. याबाबत माहिती मिळताच शिर्डीच्या पोलिस उपअधीक्षकांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांना घटनास्थळी रिकामी काडतुसे सापडली आहेत. दरम्यान, घाडगे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणला होता. पोलिसांनी परिसरातील रस्त्यांवर नाकेबंदी केली असून, "कोम्बिंग ऑपरेशन' सुरू केले असल्याचे तालुका पोलिस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांनी सांगितले. 

गावकऱ्यांवर दगडफेक 
फटाके व गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील व्यापारी व गावकरी दुकानासमोर जमले. त्यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक करीत पोबारा केला.

Web Title: jeweller death in firing by robbers