मणीमंगळसुत्र मोडून उभारलेली द्राक्षबाग पावसामुळे मातीमोल 

दिलीप कोळी
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

सुळेवाडी येथील दादासो व संतोष पांडूरंग पवार या बंधूंची दीड एकर निर्यातक्षम द्राक्षबाग आहे. आतापर्यंत या बागेचे चार हंगाम मिळाले. मात्र पाचव्या हंगामाला अति झालेल्या पावसाचे ग्रहण लागले. फुलोऱ्यात आलेल्या बागेची पावसाच्या पाण्याने फळकुज, मणीगळ झाली.

विटा (सांगली) - परतीच्या पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षांना  खानापूर तालुक्यात मोठा फटका बसला. त्यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. द्राक्षबाग वाचावी, यासाठी आवश्यक फवारण्यांसाठी पत्नीचे मनीमंगळसुत्र मोडण्याची वेळ सुळेवाडी ( ता. खानापूर ) येथील दादासो पांडूरंग पवार या शेतकऱ्यांवर आली. पण फवारणी करूनही पावसाने होत्याचे नव्हते केले. त्यामुळे श्री. पवार यांच्या दीड एकर निर्यातक्षम बागेचे सुमारे पंधरा लाख रूपयांचे नुकसान झाले. शासनाने झालेली नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे.

सुळेवाडी येथील दादासो व संतोष पांडूरंग पवार या बंधूंची दीड एकर निर्यातक्षम द्राक्षबाग आहे. आतापर्यंत या बागेचे चार हंगाम मिळाले. मात्र पाचव्या हंगामाला अति झालेल्या पावसाचे ग्रहण लागले. फुलोऱ्यात आलेल्या बागेची पावसाच्या पाण्याने फळकुज, मणीगळ झाली. बागेत साठलेल्या अति  पाण्याने मुळकुज झाली. परिणामी बागेच्या ओलांड्यावर मुळ्या फुटल्या आहेत. एखाद्या लहान मुलासारखी जपलेल्या बागेची पावसाने क्षणार्धात होत्याचे नव्हते केले. 

नुकसान झाले व द्राक्ष घड नाहीत म्हणून बाग सोडता येत नाही. पुन्हा बाग कुमकवत होऊन नुकसान होते. बागेतील चिखल सुकल्यानंतर बाग पुर्ववत होईल. आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, प्रातांधिकारी शंकर बर्गे यांच्यासह अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली. पंचनामे केले. पीक विम्यासाठी अर्ज भरा, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार श्री. पवार यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

दरवर्षी या निर्यातक्षम द्राक्षापासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले. मात्र यावर्षी पावसाने दणका दिला. आता पुन्हा बागेला उभारी आणण्यासाठी पैशांची गरज आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पैसे बँक खात्यावर जमा केल्यास बागेचे पुढील नियोजन करता येईल. असे श्री. पवार यांनी सांगितले. श्री. पवार यांच्याबरोबर सुळेवाडी परिसरातील पंचवीस ते तीस शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. 

एखाद्या लहान मुलासारखी बाग जपली होती. बागही चांगली बहरली होती. पैसे मिळण्याचा अंदाज होता. त्या अंदाजावरच दुकानदारांकडून उधारीवर आवश्यक फवारणीच्या निविष्ठांची खरेदी केली होती. दुकानदारांनाही माहित होते आपले पैसे मिळणार. चार लाख रूपयांची निविष्ठा खरेदी करून बागेवर फवारली. परंतु पावसाने झटका दिला. तशी बागेची स्थिती बदलली. द्राक्षबागांचे नुकसान होऊ लागल्याने दुकानदार उधार देण्यास नकार देवू लागले. मात्र बाग जगविण्यासाठी प्रसंगी पत्नीचे मनीमंगळसुत्र मोडले व खरेदी केली. तरीही बागेचे मोठे नुकसान झाले. ते न भरून येण्यासारखे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jewelry Sold To Save Grape Farm But No Use All Lost