बसस्थानकातून जितेंद्र शिंदेला पकडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

तपासी अधिकाऱ्याची सरतपासणी; पीडित मुलीच्या अंगावर जखमा

तपासी अधिकाऱ्याची सरतपासणी; पीडित मुलीच्या अंगावर जखमा
नगर - 'कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असून, तिला उपचारासाठी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्याची माहिती समजल्यानंतर तेथे गेलो. पीडित मुलीच्या अंगावर, गालावर जखमा होत्या. गळ्यावर काळेनिळे झाले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे बसस्थानकात पकडले. त्या वेळी त्याच्या अंगावरील कपड्यांवर, तसेच घरात घेतलेल्या झडतीमध्ये सापडलेल्या मोबाईलवरही रक्ताचे डाग होते,'' अशी साक्ष आज कर्जत पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांनी दिली.

कोपर्डी अत्याचार व खूनखटल्याची सुनावणी विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांची आज सरतपासणी घेतली. गवारे म्हणाले, ""मला 13 जुलै 2016 रोजी ठाणेअंमलदाराने कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती दिली. घटनेची खात्री करण्यासाठी मी कोपर्डीकडे निघालो असताना, पीडित मुलीला उपचारासाठी कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कुळधरणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मी पाहणी केली. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मृतदेहाची पाहणी केली असता, पीडित मुलीच्या गालावर, अंगावर जखमा होत्या. गळ्याजवळ काळेनिळे झाले होते.'' गवारेंची उर्वरित सरतपासणी उद्या (मंगळवारी) होणार आहे.

Web Title: jitendra shinde arrested