‘जीवनवाहिनी’च्या स्वच्छतेसाठी त्रिसूत्री!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

सातारा - ‘नमो गंगे’च्या धर्तीवर सातारा जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १५ नद्यांच्या स्वच्छतेसाठी दोन वर्षांपासून पावले उचलली असली तरी, त्याला आता अधिक गती मिळत आहे. या जीवनवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी, संवर्धनासाठी ‘त्रिसूत्री’ निश्‍चित केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ३०७ गावांकडून जिल्हा परिषदेने उपाययोजनांची माहिती मागविली आहे. 

सातारा - ‘नमो गंगे’च्या धर्तीवर सातारा जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १५ नद्यांच्या स्वच्छतेसाठी दोन वर्षांपासून पावले उचलली असली तरी, त्याला आता अधिक गती मिळत आहे. या जीवनवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी, संवर्धनासाठी ‘त्रिसूत्री’ निश्‍चित केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ३०७ गावांकडून जिल्हा परिषदेने उपाययोजनांची माहिती मागविली आहे. 

जिल्ह्यातून कृष्णा, कोयना या प्रमुख नद्यांसह ११ नद्या वाहतात. त्यात मोठ्या प्रमाणात घरगुती तसेच औद्योगिक सांडपाणी मिसळत आहे. परिणामी, जलस्त्रोत खराब होऊन त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. गावस्तरावर सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते पाणी थेट नदी, ओढे, नाल्यांद्वारे नदीत जाते. दूषित पाण्यामुळे गावात विविध जलजन्य रोगांच्या साथीत वाढत होत आहे. या अनुषंगाने सर्व नद्यांकाठच्या गावांत शास्त्रीय पध्दतीने सांडपाणी व्यवस्थापन करून नद्यांचे जलप्रदूषण कमी करण्यासाठी नुकतीच सांडपाणी व्यवस्थापन कार्यशाळा झाली. त्याद्वारे त्रिसूत्री निश्‍चित केली असून, ती राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. 

या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर संबंधित विस्तार अधिकारी (पंचायत समिती) यांची स्वच्छता निरीक्षक म्हणून नेमणूक करून सातत्याने आढावा घेणे, उपाययोजना न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना डॉ. शिंदे यांनी दिल्या आहेत. 

मागवलेली माहिती 
नदीत किती ठिकाणी, किती लिटर सांडपाणी मिसळते, सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते का, १४ व्या वित्त आयोगातून किती तरतूद केली आहे, ग्रामपंचायतीच्या मालकीची किती जागा उपलब्ध, वैयक्‍तिक शोषखड्डे किती, परसबागांसाठी जागा उपलब्ध असलेली कुटुंबे किती आदी माहिती ग्रामपंचायतींकडून मागविली आहे.

सर्वाधिक गावे कऱ्हाडला
कृष्णा, कोयना, नीरा, माणगंगा, कुडाळी, उरमोडी, तारळी, वसना, वांगणा, येरळा, चांद या नद्यांकाठच्या गावांमध्ये उपक्रम राबविले जातील. नदीकाठची तालुकानिहाय गावे : सातारा ४९, कोरेगाव २२, वाई १२, कऱ्हाड ७२, पाटण ५५, महाबळेश्‍वर १०, खटाव १९, खंडाळा ८, फलटण २१, जावळी २७, माण १२.

...अशी आहे त्रिसूत्री
गावात निर्माण होणारे सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळणार नाही, यासाठी वैयक्‍तिक स्तरावर शोषखड्डे, परसबागा आदी, तर सार्वजनिक स्तरावर वृक्षारोपण, स्थिरीकरण, तळी, मोठे पाझर खड्डे काढून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते कमीत कमी नदीपात्रात मिसळेल, याची दक्षता घेणे.

नदीपात्रात धुणी, भांडी, जनावरे, गाड्या धुण्यास बंदी घालावी. तसेच देव-देवतांच्या मूर्तींचे, निर्माल्याचे विसर्जनासाठी ग्रामपंचायतींनी स्वतंत्र जलकुंड बांधून त्यातच विजर्सन करावे.

विद्यार्थी, ग्रामस्थांमध्ये जलप्रदूषण कशाने होते, त्याचे तोटे काय, याबाबत जनजागृती करणे.

Web Title: Jivanvahini Cleaning Krishna River