'जोहड'च्या कन्नड अनुवादाचे प्रकाशन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

कथ्थक नृत्यावर आधारित एका कादंबरीचे लेखन सध्या हातावेगळे करीत आहे. "जोहड' कन्नड, हिंदी आणि इंग्रजीत प्रकाशित होत आहे, याचे समाधान आहे. आणखी अनेक संकल्पित पुस्तके आहेत. 
सुरेखा शहा, ज्येष्ठ लेखिका

सोलापूर ः येथील ज्येष्ठ लेखिका सुरेखाताई शहा यांच्या"जोहड' या चरित कादंबरीची नववी आवृत्ती प्रसिद्ध होत असून तिच्या हिंदी अनुवादाची दुसरी आवृत्ती येत आहे. या कादंबरीचे इंग्रजीतही भाषांतर झाले असून विश्‍वकर्मा प्रकाशनातर्फे ते प्रसिद्ध होत आहे. याखेरीज "जोहड'च्या कन्नड अनुवादाचे प्रकाशन नुकतेच झाले आहे. 

सोलापूरच्या एखाद्या साहित्यिकाच्या पुस्तकाच्या नऊ आवृत्त्या प्रसिद्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुरेखा शहा यांनी हे पुस्तक जलपुरुष राजेंद्रसिंह यांच्या व्यक्तिमत्त्वावर लिहिले आहे. नाना पाटेकर, श्रीकांत मोघे, नीना कुलकर्णी, राजेंद्र पवार प्रभुतींनी त्याचा गौरव केला आहे. श्रीमती शहा यांची याव्यतिरिक्त अन्य सहा पुस्तके येत्या दोन महिन्यांत प्रकाशित होत आहेत. त्यात एक काव्यसंग्रह, एक ग्रामीण कथासंग्रह आणि आधी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांच्या पुढच्या प्रतींचा समावेश आहे. राणी अब्बकादेवी या त्यांच्या कादंबरीचा चंद्रकांत पोकळे यांनी कन्नडमध्ये अनुवाद केला असून त्याचे प्रकाशन 8 एप्रिलला झाले. "पधारो म्हारो देस' या कादंबरीचाही अनुवाद लवकरच प्रसिद्ध होत आहे. "शुभमंगल सावधान' आणि"पुनवडीच्या हिरकण्या' ही दोन पुस्तकेही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. 

कथ्थक नृत्यावर आधारित एका कादंबरीचे लेखन सध्या हातावेगळे करीत आहे. "जोहड' कन्नड, हिंदी आणि इंग्रजीत प्रकाशित होत आहे, याचे समाधान आहे. आणखी अनेक संकल्पित पुस्तके आहेत. 
सुरेखा शहा, ज्येष्ठ लेखिका

Web Title: johad book translation