दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज (ता. १९) मुख्य दिवस आहे. या निमित्ताने आज पहाटे श्री जोतिबा देवास प्रशासनाच्यावतीने महाभिषेक करण्यात आला. 

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज (ता. १९) मुख्य दिवस आहे. या निमित्ताने आज पहाटे श्री जोतिबा देवास प्रशासनाच्यावतीने महाभिषेक करण्यात आला. 

यंदा सलग सुट्यांमुळे विक्रमी गर्दी होणार आहे. ही संख्या आठ ते दहा लाखांवर जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गुरुवारी सुमारे दोन लाखांवर भाविक आले.

जलद कृती दल, व्हाईट आर्मी, घात विरोधी पथके होमगार्ड, पोलिसांची पथके सज्ज आहेत. गुरूवारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी भेट दिली. पंचगंगा नदी घाटापासून चालत येणाऱ्या भाविकांमुळे रस्ते गर्दीने फुलून गेले. कुशिरे, पोहाळे, गिरोली, निगवे, वडणगे गावातून हलगी आणि पिपाणीच्या सुरात भाविकांचे जथ्थे चांगभलंच्या गजरात डोंगरावर आले.

दरम्यान, यात्रेच्या पूर्वसंध्येला देवाची दुपारी बैठी महापूजा बांधली होती. भाविकांनी चव्हाण तळे परिसर, एसटी स्टॅंड, यमाई बाग परिसरात जागा निश्‍चित केल्या. उन्हाच्या तीव्र कडाक्‍यामुळे भाविकांना चक्कर येणे, रक्तदाब, उष्माघात यांसारख्या घटना घडल्या. तत्काळ त्यांच्यावर उपचार केले. सायंकाळी पाडळी, मौजे विहे, किवळ, कसबे डिग्रज, कसबा सांगाव, मनपाडळे, दरवेश पाडळी, फाळकेवाडी, विठ्ठलवाडी, सांगलीवाडी यांच्यासह मानाच्या काठ्या सायंकाळी मूळमाया श्री यमाई मंदिराकडे दाखल झाल्या. देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ पुजारी यांनी पानाचे विडे देऊन स्वागत केले.

सासन काठ्या यमाई मंदिरमार्गे नवीन वसाहत शिवाजी पुतळा मार्गे मंदिराच्या प्रांगणात आल्या. मंदिराभोवती प्रदक्षिणा घेऊन उभ्या केल्या. तहसीलदार रमेश शेंडगे व अन्य अधिकाऱ्यांनी मंदिराचा आढावा घेतला. कोल्हापुरातील आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्ट व सहज सेवा ट्रस्टच्या वतीने अन्नछत्र सुरू आहेत. तेथे भाविकांची झुंबड उडाली होती.

मंदिरात आज दिवसभर 
- पहाटे तीनला घंटानाद.
- चार ते पाच श्रींची पाद्यपूजा काकड आरती 
- सहाला ‘श्री’स अभिषेक व महापूजा
- सकाळी सात ते आठ वाजता श्रीनाथ पोशाख.
- सकाळी आठ ते दहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले
- सकाळी दहा ते बारा वाजता धुपारती व अंगारा
- दुपारी बारा सासन काठ्यांची मिरवणूक
- सायंकाळी पालखी सोहळा
- रात्री साडेआठ पालखी सोहळा मुख्य मंदिरात परत 

जनावरांना हिरवे गवत 
कुशिरे तर्फ ठाणे येथील शहाजी दिंडे, अर्जुन पाटील, शिवाजी शिलोकर यांनी कर्नाटकातून आलेल्या बैलांसाठी हिरव्या गवताच्या ४०० पेंड्या पोहोच केल्या. 

मतदान करून यात्रेसाठी
तेलघणा (जि. बीड) येथील भाविक बन्नशीधर सिरसाट व कुंटूबीय आज आपल्या गावातून लोकसभेसाठी मतदान करून आज रात्री डोंगरावर पोचले.

 

Web Title: Jotiba Chaitra Yatra today