जोतिबा डोंगरावर मानाची पहिली सासनकाठी अन्‌ पाणपीठ उपवास

निवास मोटे
बुधवार, 10 एप्रिल 2019

एक नजर

  • दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी सासनकाठ्या डोंगराकडे येण्याची तयारी सुरू
  • चैत्र यात्रेत पाडळी (ता. जि. सातारा) या गावच्या सासनकाठीस पहिला मान
  • पाडळी ग्रामस्थांना जोतिबा डोंगराकडे येण्याचे लागले वेध

जोतिबा डोंगर - दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी सातशे ते आठशे सासनकाठ्या दरवर्षी येतात. यंदाही वाजतगाजत येणार आहेत. सासनकाठ्या डोंगराकडे येण्याची तयारी सुरू आहे. चैत्र यात्रेत पाडळी (ता. जि. सातारा) या गावच्या सासनकाठीस पहिला मान असतो. आख्खा गाव यात्रा काळात भक्तिरसात चिंब होतो. यंदा या गावात चैत्र यात्रेसाठी येण्याची तयारी जोरात सुरू आहे. पाडळी ग्रामस्थांना जोतिबा डोंगराकडे येण्याचे वेध लागले.

गावचे वैशिष्ट्य म्हणजे काही ग्रामस्थ पाणपीठचा उपवास करून अनवाणी डोंगरावर येतात. गावातील ग्रामस्थांचा डोक्‍यावर पांढरी टोपी, पांढरा शर्ट, पॅण्ट असा पोशाख असतो. या सासनकाठीस मोठा मान असून  जोतिबा डोंगराकडे येताना या काठीचे गावोगावी स्वागत होते. नारळाची, नोटांची तोरणे बांधली जातात.

गुरुवारी (ता. १८)  सायंकाळी पाचला या काठीचे आगमन डोंगरावर होईल. १५ एप्रिलला रात्री पाडळीचे ग्रामस्थ जोतिबा डोंगराकडे येण्यासाठी निघणार आहेत. १६ रोजी रात्री सासनकाठी सजविली जाईल.  सकाळी येथील पूर्ण गावच काठीसोबत डोंगरावर येण्यास निघेल. गुढीपाडव्याच्या दिवशी जोतिबा डोंगर येथील पुजारी गजानन लादे व श्रीमती अक्काताई लादे यांनी चैत्र यात्रेची सविस्तर माहिती दिली. पाडळी गावात सध्या यात्रेसाठी येणाच्या बैलगाड्या मालकांची प्रस्थानाची तयारी सुरू आहे. सून बैलगाड्यांना कमान करणे, चारा गोळा करून ठेवणे, बैलगाडी सजविणे ही कामे सुरू आहेत.

जोतिबा चैत्र यात्रेत येण्यासाठी सर्व पाडळी ग्रामस्थ सज्ज असून, यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आमच्या गावची सासनकाठी ही पहिल्या मानाची आहे. या सासनकाठीचे येताना-जाताना गावोगावी भाविक स्वागत करतात. पायी डोंगराकडे जाण्यातून आणि जोतिबा भक्तीतून ऊर्जा मिळते.    
- समाधान ढाणे, 

ग्रामस्थ, पाडळी, ता. जि. सातारा

पाणपीठ म्हणजे...
पाणपीठ म्हणजे ज्वारी, शाळू भाजून जात्यावर दळून त्याचे पीठ तयार केले जाते. ते पीठ उपवासासाठी ग्रामस्थ वापरतात. केवळ पाण्याबरोबर हे पीठ ग्रामस्थ खातात. म्हणून या उपवासाला पाणपीठ उपवास असे म्हणतात. हा उपवास ग्रामस्थ कडक करतात आणि अनवाणी चालत जोतिबा डोंगरापर्यंत चालतात. भूक लागल्यास केवळ हे पीठ खाल्ले जाते. तीन दिवस हा उपवास असतो.

Web Title: Jotiba Dongar Chitra Yatra special

टॅग्स