चांगभलं रं चांगभलं...

निवास मोटे
रविवार, 1 एप्रिल 2018

जोतिबा डोंगर - रंगबिरंगी सासनकाठ्या घेऊन भक्तिरसात तल्लीन झालेली तरुणाई... हलगी-सनई, पिपाणीचा सूर... आकाशाला गवसणी घालणाऱ्या सातशे सासनकाठ्या... तीव्र उन्हाचा तडाखा... घामाने चिंब झालेले भाविक अन्‌ गुलालमय झालेला जोतिबाचा डोंगर. मंदिर परिसरात गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंऽऽ, यमाईदेवी, चोपडाईदेवी, नंदी, काळभैरवाच्या नावानं चांगभलंऽऽच्या जयघोषात, मोठ्या भक्तिमय वातावरणात आज श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा साजरी झाली.

जोतिबा डोंगर - रंगबिरंगी सासनकाठ्या घेऊन भक्तिरसात तल्लीन झालेली तरुणाई... हलगी-सनई, पिपाणीचा सूर... आकाशाला गवसणी घालणाऱ्या सातशे सासनकाठ्या... तीव्र उन्हाचा तडाखा... घामाने चिंब झालेले भाविक अन्‌ गुलालमय झालेला जोतिबाचा डोंगर. मंदिर परिसरात गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंऽऽ, यमाईदेवी, चोपडाईदेवी, नंदी, काळभैरवाच्या नावानं चांगभलंऽऽच्या जयघोषात, मोठ्या भक्तिमय वातावरणात आज श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा साजरी झाली. यात्रेसाठी राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधून सुमारे दहा लाख भाविकांनी डोंगर फुलून गेला होता.

डोंगरावर निघालेल्या विविधरंगी सासनकाठ्यांच्या मिरवणुकीमुळे साऱ्याच डोंगरवाटांनी चैतन्याचा ताल धरला. गरिबी, महागाई अशा दैनंदिन समस्या झुगारून देत भाविक डोंगरावर आले. घामाने चिंब भिजलेल्या चेहऱ्यावर जोतिबा दर्शनाचा आनंद ओतप्रोत वाहत राहिला. जोतिबा दर्शनाची ऊर्जा घेऊन मनोमन आनंदी झालेला भक्तगण दिवसभर डोंगरमाथ्यावर विसावला.

आज चैत्र यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मंदिरात पहाटे तीनला घंटानाद झाला. त्यानंतर विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. पाद्यपूजा, मुखमार्जन व काकडआरती असे सोहळे झाले. पहाटे ५ ते ६ या वेळेत ‘श्रीं’ना शासकीय अभिषेक पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे यांच्या हस्ते झाला. यावेळी मंदिरात मंगलपाठ, केदार स्तोत्र, केदार महिमा आदींचे पठण झाले. 

सासनकाठ्या, पालखी सोहळा रंगला 
जोतिबा डोंगर - जोतिबा यात्रेत दुपारी सासनकाठ्यांची मिरवणूक आणि त्यानंतर पालखी सोहळा रंगला. 

दरम्यान, शासकीय महापूजेवेळी  पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, प्रमोद पाटील, सचिव विजय पोवार, विविध शासकीय अधिकारी, पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते. परंपरेनुसार शासकीय अभिषेक व महापूजेचा मान पन्हाळा तहसीलदारांना असतो. सध्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे तीन वर्षे येथे आहेत. त्यांचे कुलदैवत जोतिबा असून, त्यांचे गाव सिरसाव (ता. परंडा, जि. उस्मानाबाद) आहे. सलग तीन वेळा अभिषेकाचा मान मिळणारे श्री. चोबे पहिले अधिकारी आहेत.

सकाळी आठ वाजता चैत्र सोहळ्यानिमित्त जोतिबा देवाची राजेशाही थाटात सालंकृत महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. डोंगरावर येणाऱ्या सर्व भाविकांना ‘श्रीं’चे दर्शन व्हावे म्हणून पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर परिसर व शिवाजी पुतळा परिसरात मुख्य दर्शनाची व्यवस्था केली. त्यामुळे अपंग, वयोवृद्ध, महिला, लहान मुलांना दर्शनाचा सहजसाध्य आनंद घेता आला.

सासनकाठ्यांचे पूजन दुपारी दीड वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील (सरूडकर), शंभुराजे देसाई, सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर अधीक्षक श्री. काकडे, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, प्रमोद पाटील, सरपंच डॉ. रिया सांगळे, उपसरपंच दत्तात्रय दादर्णे उपस्थित होते.
सासनकाठ्यांच्या मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान निनाम पाडळी (जि. सातारा) ला मिळाला. त्यापाठोपाठ मौजे विहे (ता. पाटण), कसबे डिग्रज (ता. मिरज), हिंमत बहादूर चव्हाण-सरकार (निगवे दुमाला, ता. करवीर), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (ता. कऱ्हाड), छत्रपती (करवीर), कवठेगुलंद (ता. शिरोळ), मौजे मनपाडळे, दरवेश पाडळी (ता. हातकणंगले), सांगलीवाडी, फाळकेवाडी, विठ्ठलवाडी यांच्यासह ९६ मानाच्या सासनकाठ्या मिरवणुकीत क्रमाक्रमाने दाखल झाल्या. गजगतीने सर्व सासनकाठ्या सवाद्य मिरवणुकीने मूळ माया यमाई मंदिराकडे दाखल झाल्या.

दुपारी चार वाजता श्री जोतिर्लिंग मंदिरात ‘श्रीं’ची पालखी विविधरंगी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली. यावेळी सर्व देवसेवक,  पालखीचे मानकरी, ग्रामस्थ, पुजारी, देवस्थान समितीचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी साडेपाचला प्रवीण सुधाकर डबाणे यांनी देवभावी जलाशयासमोर तोफेची तलामी दिली आणि जोतिबाच्या नावान चांगभलंऽऽचा अखंड जयघोष सुरू झाला. पालखी मंदिरातून बाहेर आली आणि काही क्षणांतच लाखो हातांनी गुलाल-खोबऱ्याची भव्य अशी उधळण झाली. पुष्पवृष्टी केली. सारा डोंगर गुलालात न्हाला. 

पालखी सोहळा गजगतीने मेन पेठ, सेंट्रल प्लाझा मार्गे पायरी रस्त्याने यमाई मंदिराकडे गेला. सायंकाळी सव्वासात वाजता पालखी सोहळा मूळमाया यमाई मंदिरात पोचला. तेथे धार्मिक विधी झाले. रात्री परिसरात आतषबाजी करण्यात आली.

पुन्हा रात्री साडेआठला सासनकाठ्यांसह पालखी सोहळा जोतिबा मंदिराच्या परिसरात आला. पालखीच्या मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा काढल्यानंतर पालखी सदरेवर ठेवण्यात आली. येथेही धार्मिक विधी झाले. त्यानंतर गजानन डवरी, मच्छिंद्र डवरी, विश्‍वनाथ डवरी यांची डवरी गीते झाली.

चंद्रकांत पाटील म्हणाले,
राज्यात चांगला पाऊस पडू दे 
शहरांमध्ये उद्योगधंद्यांत वाढ होऊ दे
गरजूंना रोजगार मिळू दे
जोतिबा मंदिर विकास आराखडा २५ कोटींचा मंजूर आहे. पहिल्या टप्प्यात ५ कोटी मिळाले. या कामांची निविदाप्रक्रिया सध्या सुरू आहे.

मधमाश्‍यांच्या हल्ल्यात दहा जखमी 
जोतिबा डोंगरावरील तलावापाशी झालेल्या मधमाश्‍यांच्या हल्ल्यात दहाजण जखमी झाले. व्हाईट आर्मीच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. डोंगरावरील तलावाशेजारील जागेत एका झाडाखाली नवेपारगावचे काही ग्रामस्थ जेवण करत बसले होते. डोंगराच्या एका बाजूला वणावा सुरू होता. त्याचा धूर येऊ लागला तसे मोहोळ उठले आणि मधमाश्‍यांचा मोठा थवा थेट झाडाखाली बसलेल्या लोकांना चावा घेऊ लागला. अनेकजण बाजूला पळू लागले; मात्र माश्‍यांनी त्यांचा पाठलाग करून चावा घेतला. व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे व सहकाऱ्यांनी जखमींना कक्षात आणले. गंभीर जखमींना अन्य रुग्णालयांकडे पाठविले तर काहीजणांवर कक्षात उपचार केले. यात व्हाईट आर्मीचा एक जवानही जखमी झाला.

ग्रामस्थांची कुचंबणा
डोंगरावर रात्रीपासून पोलिस यंत्रणेने गल्लोगल्ली बॅरिकेडस्‌ लावून रस्ता बंद केल्याने भाविकांना पुजाऱ्यांची घरे शोधताना तारेवरची कसरत करावी लागली. स्थानिक ग्रामस्थ, पुजाऱ्यांशीही गल्लीतून ये-जा करताना पोलिसांनी हुज्जत घातली. त्यामुळे यंत्रणेबाबत ग्रामस्थांसह भाविकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.

दुहेरी दर्शनरांग अन्‌ जलद दर्शन
या वर्षी यात्रेत पोलिस यंत्रणेने मुख्य मंदिरात दोन रांगा केल्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन मिळाले. दर्शनरांगेत ठिकठिकाणी पोलिस यंत्रणा सज्ज ठेवल्यामुळे ३० ते ४० मिनिटांत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता अला. 

खोबरेवाटीस अखेर आळा
जोतिबा चैत्र यात्रेत खोबरेवाटी उधळण्यास तीन वर्षांपासून बंदी घातली आहे. डोंगरावर येणाऱ्या खोबरेवाटीचे तुकडे करून ते उधळावेत असे आवाहन प्रशासन सतत करीत होते. गतवर्षी त्यास ८० ते ९० टक्के यश आले. यंदा मात्र यात्रेत एकही वाटी उधळली गेली नाही. त्यामुळे प्रशासनास यंदा मात्र चांगले यश आले.

भाविकांना लाडू वाटप
रविवार पेठेतील श्री महाभद्रकालिका मंदिर संस्था पुरस्कृत श्री नरहरी युवा मंचतर्फे भाविकांना राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी असणाऱ्या मंचच्या कार्यकर्त्यांनी काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत लाडूचे वाटप करण्याची सेवा बजावली.

संजय मोहिते सकाळी नऊलाच डोंगरावर
सलग चार दिवस सुटी असल्याने डोंगरावर आज चैत्र यात्रेत मोठी गर्दी झाली. गर्दीने उच्चांक केला. डोंगरावर गर्दी वाढू लागल्याने पोलिस अधीक्षक संजय मोहिते सकाळी नऊ वाजता डोंगरावर हजर झाले. बंदोबस्ताची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दिवसभर ते तळ ठोकून होते.

व्हाईट आर्मीचाही दवाखाना
भाविकांच्या सेवेसाठी व्हाईट आर्मीने डोंगरावर तात्पुरता वातानुकूलित दवाखाना उभा केला आहे. त्यामुळे गरजू भाविकांवर तातडीच्या उपचाराची व्यवस्था झाली. सीपीआर, केखले, बोरपाडळे आरोग्य केंद्र, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, रोटरी क्‍लब यांचीही आरोग्य पथके भाविकांच्या सेवेसाठी सज्ज होती.

मानाची पहिली सासनकाठी
जोतिबा चैत्र यात्रेतील खास आकर्षक म्हणजे मानाची पहिली सासनकाठी निनाम पाडळी (जि. सातारा) या गावची. या सासनकाठीसोबत संपूर्ण गाव आले आहे. त्यांचा ड्रेस कोड पांढरा शर्ट, पांढरी पॅंट, डोक्‍यावर पांढरी टोपी. त्यामुळे यात्रेत त्यांचे एक वेगळेपण जाणवते. या सासनकाठीचा मिरवणुकीत पहिला मान आहे.

अन्नछत्रांवर झुंबड
डोंगरावर आर. के. मेहता - चॅरिटेबल ट्रस्ट व सहज सेवा ट्रस्ट यांची मोफत अन्नछत्रे कालपासून खुली झाली आहेत. तेथे महाप्रसादासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. उद्यापर्यंत अन्नछत्रे सुरू राहणार आहेत. त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सेवा देणाऱ्या संस्था आणि व्यक्ती
व्हाईट आर्मी, अनिरुद्ध सेवाभावी संस्था, दिनकर कांबळे, रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सनराईज, कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा फोर व्हीलर असोसिएशन.

मोफत बससेवा
देवस्थान समितीने पायथ्यापासून भाविकांना आणण्यासाठी ४० केएमटी गाड्यांची मोफत व्यवस्था केली आहे. दानेवाडी फाटा, गिरोली फाटा येथे दुचाकी, चारचाकी पार्किंग व्यवस्था होती.

पाण-पीठ उपवास
पाडळी निनाम (जि. सातारा) येथील शंभर भाविक पाण-पीठ उपवास करून अनवाणी पायाने डोंगरावर दाखल झाले. तीन दिवस उपवास असतो. पाण-पीठ म्हणजे केवळ ज्वारीचे पीठ पाण्यात टाकून त्याचे सेवन करणे. काल या भाविकांनी उपवास सोडला. नवस पूर्ण करण्यासाठी हा उपवास करतात.

पालखी सोहळ्याआधीच दरवाजे बंद
श्री जोतिबाचा पालखी सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता होतो. सोहळ्यावेळी चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून तासभर आधीच पोलिस यंत्रणेने दरवाजे बंद करून भाविकांना हटविले. त्यामुळे आतील भाविक आत व बाहेरचे बाहेर राहिले. त्यांना पालखीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण करता आली नाही.

Web Title: jotiba dongar jotiba yatra