Jotiba Dongar : जोतिबा खेट्यांतून तरुणाईत रुजला फिटनेसचा ट्रेंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jotiba Dongar

Youth Fitness Trend : जोतिबा खेट्यांतून तरुणाईत रुजला फिटनेसचा ट्रेंड

‘दख्खनचा राजा जोतिबा माझा, बोलूया चांगभलं’च्या माहोलात रविवारपासून जोतिबाच्या खेट्यांना प्रारंभ होत आहे. खेटे आणि यात्रेनंतरच्या पाकाळण्यापर्यंत आरोग्याचा हा उत्सव सुरू राहणार आहे.

यात्रेनिमित्ताने होणारे खेटे आणि पाकाळण्या आहेतच. पण, सुमारे चाळीस वर्षांपूर्वी प्रत्येक रविवारी कोल्हापुरातून जोतिबाला पायी चालत जाण्याचा उपक्रम सुरू झाला आणि आता तो शारीरिक आणि मानसिक अशा सर्वांगीण आरोग्याची गुरुकिल्लीच बनला आहे. त्यातून फिटनेसचा एक आगळा वेगळा ट्रेंड रुजला आहे.

- संभाजी गंडमाळे

चार दशकांचा इतिहास

जोतिबाला वर्षभर प्रत्येक रविवारी चालत जाण्याच्या उपक्रमाला साडेतीन ते चार दशकांचा इतिहास आहे. सुरवातीला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक जात होते... हळूहळू संख्या वाढत गेली. ज्यावेळी उपक्रम सुरू झाला तेव्हा मार्गावर फारशी वर्दळ व वस्ती नव्हती.

त्यामुळे विशिष्ट अंतरावरून एकमेकांना हाका देत ही मंडळी डोंगरावर जात असत; मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आजही प्रत्येक रविवारी पहाटे साडेतीन ते सव्वाचारपासून विविध गट छत्रपती शिवाजी पुलावरून पायी डोंगराकडे प्रस्थान करतात. साडेसहा-सातपर्यंत दर्शन आटोपून पुन्हा माघारी परततात.

कोरोनाची बाधा नाही...

जोतिबाला पायी जाण्याचा पारंपरिक मार्ग म्हणजे एक शास्त्रशुद्ध मार्ग आहे. विशिष्ट चढ-उतारांवर येथे आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. त्यामुळे दक्षिण महाद्वाराजवळ पोहचलं की शारीरिक आणि मानसिक ताण-तणाव कुठल्या कुठे पळून जातो.

पूर्वी गिर्यारोहण करणाऱ्यांसाठी हा मार्ग एक कार्यशाळा असायची. आता विविध क्रीडा प्रकारांपासून आयर्न मॅनपर्यंतच्या तयारीसाठीचा सराव याच मार्गावर सर्वाधिक होतो.

कोरोना काळात जाणवलेली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक रविवारी जोतिबाला पायी जाणाऱ्यांपैकी नव्वद टक्क्यांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे डॉ. अमर अडके सांगतात.

विधायक उपक्रमांचीही जोड

जोतिबाला पायी जातानाच काही गटांनी गेल्या काही वर्षांत यानिमित्ताने विधायक उपक्रमांवरही भर दिला आहे.

कोणी चालत जाताना कचरा व प्लास्टिक पिशव्या संकलित करून त्याची विल्हेवाट लावतात. कोणी गायमुख आणि डोंगराच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून ती झाडे जगवली आहेत. काही गटांनी पाझर तलावांचे प्रयोगही यशस्वी केले आहेत.

पारंपरिक मार्ग असा

  • छत्रपती शिवाजी पूल, वडणगे, निगवे फाटा, कुशिरे, पादुका मंदिर, वरील पायऱ्या, वरील पादुका, विसाव्याचा आंबा, वाघजाई, पिंपर्णी, गायमुख, मुख्य पायऱ्या, खालचा गणपती, पायऱ्या, वरील गणपती, दक्षिण महाद्वार

  • पर्यायी इतर कमी अंतराचे मार्ग

  • कुशिरेत वाहने उभी करून कुशिरेमार्गे जोतिबा मंदिर

  • गायमुखावर वाहने लावून गायमुख ते जोतिबा मंदिर

  • पोहाळे, गिरोली, दाणेवाडी, केखले व वाघबीळ ते जोतिबा मंदिर.

  • अलीकडच्या काळात पायी जाणाऱ्यांबरोबरच सायकलिंग करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. मात्र, सायकलिंगसाठी केर्लीमार्गे मुख्य मार्गाचा वापर करावा लागतो.

दृष्टीक्षेपात जोतिबा खेटे

  • छत्रपती शिवाजी पूल ते जोतिबा अंतर : १४.५ किलोमीटर

  • चालत जाताना शरीरातील खर्ची पडणारी ऊर्जा (कॅलरी) : ३५० ते ४५०

  • प्रत्येक रविवारी चालत जाणाऱ्यांची संख्या : १५०० ते २०००

  • खेटे व पाकाळणीला चालत जाणाऱ्यांची संख्या : १५ ते २० हजार

  • गायमुखावरून मंदिरापर्यंत जाण्यास लागणारा वेळ : ४५ ते ५० मिनिटे

अशी प्रथा...अशी परंपरा...

श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या खेट्यांना रविवारपासून प्रारंभ होत आहे. या खेट्यांसाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. माघ महिन्यात होणाऱ्या या खेट्यांच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. खेट्यांना पहाटे चार वाजल्यापासून प्रारंभ होतो.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीत अंघोळ करून कोल्हापूरकर जोतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत डोंगराच्या दिशेने चालू लागतात आणि जोतिबाकडे जाणाऱ्या डोंगरवाटा भाविकांनी फुलून जातात.

-निवास मोटे

खेट्यांची परंपरा

खेटे घालण्यासाठी कोल्हापुरातून हजारो भाविक जोतिबा डोंगरावर जातात. अनेकजण अनवाणी पायांनी डोंगरावर दर्शनासाठी येतात. कित्येक वर्षांपासून जोतिबाला खेटे घालण्याची परंपरा कोल्हापूरकरांनी जपली आहे. खेट्याच्या एखाद्या रविवारी पुजाऱ्यांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य करून पुरणपोळी व येळवणीच्या आमटीचा आस्वाद घेतला जातो.

खेटे म्हणजे काय?

जोतिबा डोंगरावर माघ महिन्यात पाच रविवारी यात्रा भरते. त्यानिमित्त भरणाऱ्या यात्रेला जोतिबाचे खेटे म्हणतात.

या खेट्यांना रविवारी भाविक अनवाणी पायानेच डोंगर चालतात. जोतिबाचा डोंगर गर्दीने फुललेला दिसतो. सांगली, सातारा, कऱ्हाड, बीड सोलापूर, लातूर भागांतील भाविक गायमुख ते जोतिबापर्यंत दगडी पायरी मार्गावरून जाऊन खेटे पूर्ण करतात.

खेट्याची आख्यायिका...

पूर्वी श्री. केदारनाथ (जोतिबा) आपली दक्षिण मोहीम संपवून हिमालयाकडे जाण्यास निघाले. हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीला समजले व ती अनवाणी पायाने कोल्हापूरहून जोतिबा डोंगरावर चालत आली व तिने जोतिबा देवाला जाऊ नये, असे विनविले.

तेव्हा श्री केदारनाथांनी डोंगरावर राहणे मान्य केले. तेव्हापासून डोंगरावर पायी खेटे घालण्याची परंपरा सुरू झाली.