जोतिबा खेट्यांना रविवारपासून प्रारंभ

निवास मोटे
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

खेटे सुरु होण्याच्या पार्श्व भूमीवर डोंगरावर सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. भाविकांनी कोणत्याही प्रकारचा दंगा, गैरवर्तन करू नये. सर्व भाविकांना श्रींचे दर्शन व्हावे, यासाठी प्रयत्न राहील. 
- संजीव कुमार झाडे, सहायक निरीक्षक कोडोली पोलिस ठाणे

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरात येथे रविवार (ता २४)पासून खेट्यांना प्रारंभ होत आहे. त्यासाठी  जोतिबाचा डोंगर सज्ज झाला आहे. 

माघ महिन्यात जोतिबाचे पाच खेटे घातले जातात.  कुशिरे, पोहाळे गिरोली, दाणेवाडी या भागातील डोंगराकडे येणारे पायी रस्ते गर्दीने फुलून जातात. त्यांना जत्रेचे स्वरूप येते. पहाटेच्या प्रहरी हा डोंगर परिसर चांगभलं च्या गजराने जयघोषाने दुमदूमून जातो. कोल्हापुरातील भाविक पंचगंगा नदीपासून अनवाणी पाय चालत येतात, तर पंढरपूर, बार्शी, बेळगाव, सांगली, सातारा या भागातील भाविक गाय मुख तलाव मार्गे पायी हजेरी लावतात.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरातील स्वच्छता व इतर कामे पूर्ण केली असून ग्रामपंचायतीने मुबलक पाणीपुरवठा व स्वच्छता ही कामे युद्धपातळीवर सुरू ठेवली आहेत. एकूणच भाविकांना खेटया बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

आरोग्यासाठी देवदर्शन
जोतिबा डोंगरावरील श्रींच्या दर्शनाच्या निमित्ताने कोल्हापुरातील पाचशेहून अधिक भाविक दर रविवारी कुशिरे गावापासून डोंगर वाटेने दर्शनासाठी येतात. या वाटेने जाण्यासाठी तासभर वेळ लागतो. दर्शनाच्या निमित्ताने आपल्या आरोग्याचा व्यायाम व्हावा यासाठी हे कोल्हापूरकर नित्यनियमाने डोंगरावर पायी येतात . यामध्ये डॉक्‍टर, वकील, उद्योगपती, सामान्य भाविक, महिला, जोतीबा वॉकर्स असे विविध गट करतात. यात १० ते १५ जण असतात. हे गट रविवारी पहाटे जोतिबाचा डोंगर चढतात.

कोल्हापूरकर आणि खेटे
खेट्याच्या निमित्ताने पाच रविवारी अख्खं कोल्हापूर जोतिबाच्या दर्शनासाठी डोंगरावर येते. मध्यरात्रीपासून हातात बॅटरी घेऊन  कोल्हापूरकर अनवाणी पायाने डोंगराची वाट चालू लागतात. पंचगंगा नदीत स्नान करून त्यांची ही पदयात्रा सुरू होते. 

खेटे सुरु होण्याच्या पार्श्व भूमीवर डोंगरावर सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. भाविकांनी कोणत्याही प्रकारचा दंगा, गैरवर्तन करू नये. सर्व भाविकांना श्रींचे दर्शन व्हावे, यासाठी प्रयत्न राहील. 
- संजीव कुमार झाडे,
सहायक निरीक्षक कोडोली पोलिस ठाणे

खेटे म्हणजे काय ?.

 माघ महिन्यातील पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱ्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात .या रविवारी भाविक शक्यतो अनवाणी पायाने चालत येतात .यामध्ये महिला, वयोवृद्ध, मुले, तरुण वर्ग या भाविकांची संख्या लक्षणीय असते. गर्दीमुळे संपूर्ण ज्योतिबा डोंगर गर्दीने फुलून जातो. यावेळी चांगभलचा अखंड जयघोष होतो. कोल्हापुरातील भाविक तर पंचगंगा नदी ते कुशिरे गायमुख तलाव मार्गे जोतिबावर येतात . सांगली, सातारा, बेळगाव, पुणे, मुंबई या भागातील भाविक गायमुख तलाव, पायरी रस्ता, दक्षिण दरवाजा मार्गाने  अनवाणी पायाने चालत जोतिबावर येतात

खेटयाची आख्यायिका

केदारनाथ (जोतिबा )आपली दक्षिण मोहीम संपवून हिमालयाकडे जाण्यास निघाले. हे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीला कळाले व ती अनवाणी पायाने कोल्हापूरहून डोंगरावर आली व तिने जोतिबा देवास जाऊ नये, अशी विनंती केली. तेव्हा त्यांनी डोंगरावर राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते जोतिबा अनवाणी पायाने खेटे घालण्याची प्रथा सुरू झाली.

 

Web Title: Jotiba Khete starts from sunday