जोतिबा यात्रा अन्‌ व्हाईट आर्मीची सेवा

निवास मोटे
बुधवार, 19 एप्रिल 2017

10 भाविकांचे वाचविले प्राण; वातानुकूलित दवाखान्यात तातडीने उपचार

10 भाविकांचे वाचविले प्राण; वातानुकूलित दवाखान्यात तातडीने उपचार
जोतिंबा डोंगर - येथील चैत्र यात्रेत यंदा व्हाईट आर्मीने तीन दिवस चोवीस तास आपत्कालीन वैद्यकीय केंद्र अत्याधुनिक वातानुकुलित सुविधांसह सज्ज ठेवल्यामुळे साडेतीन हजार भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. उन्हाच्या तीव्र तडाख्यात उष्माघाताच्या भाविकांना तातडीचे उपचार केल्यामुळे दहा भाविकांचे प्राण वाचले.

या एसी रुग्णालयात सहा बेडसह ऍम्ब्युलन्स सेवा, ईसीजी मशीन, बंद हृदय चालू स्थितीत करण्याची हार्ट ब्रिगेड यंत्रणा, टाके घालण्याची सोय, सलाईन व मेडिसीन सोय, दमछाक झालेल्या भाविकांसाठी विश्रांतीगृह अशा सुविधा ठेवल्यामुळे जखमी भाविकांवर उपचार करणे शक्‍य झाले. यंदा उन्हाचा तडाखा मोठा असल्यामुळे व्हाईट आर्मीने डोंगरावर चैत्र यात्रेत वातानुकुलित दवाखाना उभा केला. यात्रा काळात झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत या दवाखान्यास मंजुरी देण्यात आली. चैत्र यात्रेच्या आदल्या दिवशी हा तात्पुरता एसी दवाखाना भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाला. उष्माघात, रक्तदाब, चक्कर येणे असे रुग्ण दवाखान्यात दाखल झाले. गंभीर रुग्णांना मात्र कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाकडे पाठविण्यात आले.

दरम्यान, यात्रा काळात व्हाईट आर्मीचे जवान दर्शनरांगेतील भाविकांना, तसेच पोलिस यंत्रणेस सहकार्य करीत होते. गर्दीमध्ये लहान मुले, वयोवृद्धांना नातेवाइकांपर्यंत पोचविण्याचे कामही या जवानांनी केली. गेल्या बारा वर्षापासून यात्रेत व्हाईट आर्मी अखंडपणे आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सेवा देते. आजअखेर 19 हजार 381 भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. यात्रा काळात मोफत वैद्यकीय केंद्राची सुरवात संस्थेचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी काही मोजक्‍या कार्यकर्त्यांसह केली. यात आज अनेक कार्यकर्ते सेवेसाठी दाखल झालेले आहेत. प्रतिवर्षी चैत्र यात्रेत व्हाईट आर्मीस ऍस्टर आधार हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांची निहा संघटना, जनरल प्रॅक्‍टिसनर्स असोसिएशन, किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभते.

आम्ही आपत्कालीन वैद्यकीय सुविधेची सुरवात बारा वर्षांपासून डोंगरावर केली. यंदाच्या चैत्र यात्रेत तर आम्ही वातानुकुलित सर्व सुविधांनीयुक्त असा दवाखाना उभा करून अनेक भाविकांचे प्राण वाचविले.
- अशोक रोकडे, संस्थापक, व्हाईट आर्मी.

व्हाईट आर्मीच्या दवाखान्याचा उपयोग हजारो भाविकांना झाला. व्हाईट आर्मीची यात्रा काळात अखंड सेवा अनेक वर्षांपासून आहे. यंदा त्यांनी एसी दवाखाना सुरू केल्यामुळे उष्माघात, रक्तदाब, चक्कर असा त्रास झालेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळाले. ग्रामस्थांकडून व्हाईट आर्मीच्या या सेवेला सलाम.
- डॉ. सौ. रिया सांगळे, सरपंच, जोतिबा डोंगर, ता. पन्हाळा.

Web Title: jotiba yatra & white army service