खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

पंढरपूर: एका डॉक्‍टरकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरुन पोलिसांनी तोतया पत्रकारासह सहा जणांना अटक केली.

पंढरपूर: एका डॉक्‍टरकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरुन पोलिसांनी तोतया पत्रकारासह सहा जणांना अटक केली.

या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, येथील इसबावी भागात डॉ. अतुल विलास हावळे (वय 40 रा. भंडीशेगाव ता. पंढरपूर) यांचे माऊली हॉस्पिटल आहे. रविवारी (ता.4) आरोपी दिपक उत्तम थोरात (रा. माऊली नगर, पंढरपूर), प्रशांत विठ्ठल कुलकर्णी (रा. भडगावकर राम मंदिर, विजापूर गल्ली, पंढरपूर), मंदार श्रीकांत मंगसुळकर (रा. हरिदास वेस, पंढरपूर), तानाजी चव्हाण (रा. कॉलेज चौक, पंढरपूर), सागर माने (रा. वाखरी ता.पंढरपूर) आणि सुनील हरिदास बोराडे (रा. इसबावी, पंढरपूर) हे डॉ. हावळे यांच्या माऊली हॉस्पिटल मध्ये गेले. आरोपी दीपक थोरात याने आपण महाराष्ट्राचा मानवाधिकार संघटनेचा मुंबई येथील मुख्य साहेब आहे. तुमच्या बद्दल माझ्याकडे बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत. त्याची फाईल माझ्याकडे आहे. आम्ही तुमची व तुमच्या दवाखान्याची मिडिया मार्फत बदनामी करु अशी धमकी देऊन सर्व आरोपींनी फिर्यादी डॉ. हावळे यांच्याकडे 20 लाख रुपये रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास फिर्यादीस जीवे ठा मारुन टाकू अशी धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीकडून 5 लाख रुपयांचा चेक घेतला व एक लाख रुपये फिर्यादीची पत्नी डॉ.सुषमा ही घेऊन येई पर्यत फिर्यादीस आरोपींनी त्यांच्याकडील मोटार (क्र. एम एच 14- डी ए 5000) मध्ये जबरदस्तीने बसवून पंढरपूर शहरात घेऊन गेले. या प्रकरणी डॉ. हावळे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरुन पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी आरोपींच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Journalist arrested in counterfeit money seeking