कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

सोलापूर - राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या पाच विभागांतील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे.

सोलापूर - राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या पाच विभागांतील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांनी यासंबंधीची यंत्रसामग्री एका महिन्यात उपलब्ध करून ही पद्धत सुरू करण्याचे आदेशही शिक्षण विभागाने दिले आहेत. यापूर्वी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमितपणे महाविद्यालयात न येता केवळ प्रात्यक्षिकांसाठीच येतात. इतर वेळी हे विद्यार्थी कोचिंग क्‍लासेसला उपस्थित राहतात. याबाबतच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत खातरजमा करून प्रत्येक महाविद्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा बसवली की नाही, याचा अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयांमध्ये ही प्रणाली सुरू आहे किंवा नाही याचा आढावा घेण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

महाविद्यालयाची मान्यता काढून घेणार
वरील पाच विभागातील जी कनिष्ठ महाविद्यालये बायोमेट्रिक हजेरीबाबत आवश्‍यक ती कार्यवाही करणार नाहीत, त्यांची मान्यता काढून घेण्याची कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील उपस्थितीचे निकष पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांवर राहणार आहे.

कोचिंग क्‍लासेसवर परिणाम होणार?
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करून सरकार राज्यातील खासगी कोचिंग क्‍लासेसवर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. शासनाच्या या निर्णयाचा कोचिंग क्‍लासेसवर खरोखरच काही परिणाम होणार का? याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष राहील.

Web Title: junior college student biometric presenty