हळव्या विद्यार्थ्यांची द्रवली मने, दिली अशी मायेची ऊब! 

श्रीनिवास दुध्याल 
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

आम्ही रात्रीच्या वेळी रंगभवन परिसरातून फेरफटका मारताना थंडीत कुडकुडत झोपलेल्या बेघरांना पाहिले. त्यांच्याकडे थंडीपासून रक्षणासाठी काहीच नव्हते. मग आमच्या सोलापुरातील मित्रांसह या बेघरांना ब्लॅंकेट देण्याचा निर्णय घेतला व रात्रीच्या वेळी गरजवंतांच्या अंगावर ती पांघरली. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून खूप आनंद झाला. कारण, "माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे' यालाच माणुसकी म्हणतात ना! 

सोलापूर : शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांकडून बेघर, असाहाय्यांसाठी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, चादर वाटप आदी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, कुठलीही संस्था व संघटना नसताना, केवळ मनात दातृत्वाची भावना निर्माण होऊन इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी केलेली असाहाय्यांना मदत, ही आजच्या तरुण व युवा पिढीला आदर्शवत ठरणारी आहे. 

हेही वाचा : गुड न्यूज... कांद्याला मिळाला चक्क 14 हजार 200 रुपयांचा उच्चांकी दर 

येथील स्थानिक व इतर तालुक्‍यांतून शिक्षणासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हळव्या मनांमध्ये शहरातील विविध भागांत थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या वृद्ध, बेघरांबाबत हळहळ निर्माण झाली. नुसते हळहळत बसण्यापेक्षा या विद्यार्थ्यांनी रात्रीच्या वेळी शहरात फेरफटका मारून थंडीत कुडकुडणाऱ्या असाहाय्य जिवांवर ब्लॅंकेट पांघरून मायेची ऊब दिली. अमर सुतार (तुळजापूर), सुशांत साठे (बीबी दारफळ) व प्रशांत राऊत (सावरगाव) हे तीन विद्यार्थी वालचंद महाविद्यालयात अकरावी शास्त्र शाखेत शिकत आहेत. येथील कर्णिकनगर येथे ते रूम करून राहत आहेत. मंगळवारी (ता. 3) रात्रीच्या वेळी रंगभवन परिसरात फेरफटका मारत असताना त्यांना त्या परिसरात काही बेघर, असाहाय्य व्यक्ती दिसल्या, ज्या रात्रीच्या थंडीत कुडकुडत, अंग चोरून थंडीपासून बचाव करत झोपले होते. हे दृष्य पाहून या 16 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले. एवढ्या कडक थंडीत आपण जर्किन, स्वेटर, कानटोपी आदी वापरूनसुद्धा तसेच रात्री बंद खोलीत झोपताना ब्लॅंकेट पांघरूनसुद्धा थंडी जाणवतेच. मात्र, या बेघर, असाहाय्य व्यक्ती रस्त्यावर झोपलेल्या, कोणी प्लास्टिक अंगावर पांघरून तर कोणी अंग चोरून थंडीपासून बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत झोपले होते. 

Image may contain: one or more people

हेही वाचा : उजनी जलाषयात पाणी नव्हे विष..! 

हे दृष्य पाहून या विद्यार्थ्यांनी आपल्या सोलापुरातील मित्र मंदार कुलकर्णी (इलेक्‍ट्रिक इंजिनिअरिंग शेवटचे वर्ष) याला ही बाब निदर्शनास आणून दिली. केदारने त्या बेघरांना ब्लॅंकेट देण्याची कल्पना सुचवली, तसे या विद्यार्थ्यांनी लगेच ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लगबग सुरू केली. येथील असद मुन्शी, प्रार्थना फाउंडेशनचे सदस्य गोविंद तिरनगरी व श्रीनाथ पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली 20 ब्लॅंकेट्‌स खरेदी केल्या. 
ब्लॅंकेट्‌स हाती आल्यानंतर या सर्वांनी शहरातील कुमठा नाका, गुरुनानक चौक, सात रस्ता, रेल्वे स्टेशन, भय्या चौक, एसटी स्टॅंड, रंगभवन, सिव्हिल चौक या परिसरात रात्रीच्या वेळी फेरफटका मारून सर्वेक्षण केले. या वेळी रस्त्यावर चांगल्या पोशाखातील काही दारूडेही झोपलेले आढळले. अशांना वगळून ज्येष्ठ, अपंग, ज्यांना खरोखरच गरज आहे अशांच्या अंगावर ब्लॅंकेटच्या रूपाने मायेची ऊब पांघरली. या वेळी असाहाय्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून या विद्यार्थ्यांसह त्यांच्या सहकारी युवकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. 

हेही वाचा : संतप्त शेतकऱ्यांनी "यांना' धरले धारेवर 

माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे 
आम्ही रात्रीच्या वेळी रंगभवन परिसरातून फेरफटका मारताना थंडीत कुडकुडत झोपलेल्या बेघरांना पाहिले. त्यांच्याकडे थंडीपासून रक्षणासाठी काहीच नव्हते. मग आमच्या सोलापुरातील मित्रांसह या बेघरांना ब्लॅंकेट देण्याचा निर्णय घेतला व रात्रीच्या वेळी गरजवंतांच्या अंगावर ती पांघरली. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून खूप आनंद झाला. कारण, "माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे' यालाच माणुसकी म्हणतात ना! 
- प्रशांत राऊत, विद्यार्थी, वालचंद महाविद्यालय, इयत्ता अकरावी शास्त्र विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The junior college students great helping mind