अवघ्या एका तासात "जैसे थे'!

दौलत झावरे
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

जिल्हा परिषद इमारतीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या इमारतीत जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यांतील दोनच सध्या वापरात आहेत. तिसरे प्रवेशद्वार अतिक्रमणांमुळे बंद ठेवण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागूनच सुमारे 40 जणांनी व्यवसाय थाटले आहेत.

नगर ः जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणांचा त्रास जिल्हा परिषदेमध्ये ये-जा करणाऱ्यांना नेहमीचाच. अतिक्रमणधारकांना त्याबाबत अनेकदा समज दिली. मात्र, त्यांनी कानाडोळाच केला. वैतागलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने अखेरीस महापालिका प्रशासनास विनंती केली. महापालिकेनेही तातडीने दखल घेऊन पाहणी केली आणि ही अतिक्रमणे अक्षरश: जमीनदोस्त केली. मात्र, अतिक्रमणविरोधी पथक पुढे जाताच, अतिक्रमणधारकांनी पुन्हा त्याच ठिकाणी दुकाने थाटली. यावरून "अतिक्रमण हटाव' मोहिमेला कोणीच जुमानत नाही, हे स्पष्ट झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

जिल्हा परिषद इमारतीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या इमारतीत जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यांतील दोनच सध्या वापरात आहेत. तिसरे प्रवेशद्वार अतिक्रमणांमुळे बंद ठेवण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागूनच सुमारे 40 जणांनी व्यवसाय थाटले आहेत. यामध्ये फळविक्रेते, चहाच्या टपऱ्या, भेळविक्रेत्यांचा समावेश होता. "अतिक्रमण हटाव' मोहीम राबविल्यामुळे येथील सर्व व्यावसायिकांची पळापळ झाली. जिल्हा परिषदेच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या सर्व अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोरील रस्त्याने एक तास तरी मोकळा श्‍वास घेतला.

पोलिस बंदोबस्त नसताना ही "अतिक्रमण हटाव' मोहीम राबविण्यात आली. मोहिमेला सकाळी दहा वाजता सुरवात करून ती अकरा वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली. एका तासात 40 अतिक्रमणे काढण्यात आली. मात्र, ही मोहीम संपल्यानंतर पुन्हा एका तासातच अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे केली आहेत. या भागात 30 जणांचे अतिक्रमण झाले आहे. फळविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तेथे पुन्हा दुकाने थाटली आहेत.

ही मोहीम राबविल्यानंतर या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले. अतिक्रमणविरोधी मोहीम महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपअभियंता सुरेश इथापे, सुरेश मिसाळ, राहुल तनपुरे आदी 17 जणांच्या पथकाने राबविली.

मोहीम फत्ते झाल्यानंतर अतिक्रमणविरोधी विभागाचे पथक महापालिकेत पोचत नाही तोच पाठीमागे जिल्हा परिषदेच्या संरक्षक भिंतीलगत अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत करण्यात आली. ही अतिक्रमणे होत असताना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मात्र, त्याकडे डोळेझाक केल्याचे दिसून आले.

रिक्षांबाबत अधिकारी पोलिसांशी बोलणार का?

जिल्हा परिषदेसमोर रिक्षाचालकांचा वावर कायम असतो. या रिक्षांचा जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्यांना कायम अडथळा होतो, अशी तक्रार आहे. अतिक्रमणांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला, तसाच पुढाकार अडथळा ठरणाऱ्या रिक्षांबाबत घेणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

भिंत बनली धोकादायक

जिल्हा परिषदेच्या संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून, या भिंतीला अतिक्रमणधारकांनी मोठे गज, खिळे ठोकून सावलीसाठी ताडपत्र्या लावल्या आहेत. त्यामुळे संरक्षक भिंत कधीही कोसळण्याची दाट शक्‍यता आहे.

सुरक्षारक्षकांना सूचना

अतिक्रमण होऊ नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सुरक्षारक्षकांना सूचना देत आहेत. सुरक्षारक्षकांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आवारातील सुरक्षेची असतानाही त्यांना बाहेरील काम पाहण्यास सांगितले जात आहे. मुख्यत्वे ही जबाबदारी बांधकाम विभागाची असताना त्यांना सूचना दिल्या गेलेल्या नाहीत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर आम्ही ती अतिक्रमणे हटविली. त्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, याची खबरदारी जिल्हा परिषदेने घेणे गरजेचे आहे.

सुरेश इथापे, उपअभियंता, नगररचना विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In just an hour "Like Thee"!