रिक्षात विसरलेल्या पर्समधील दागिने दिले मित्राकडे! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

सोलापूर : रिक्षात विसरलेले पाच लाख 10 हजार रुपयांचे 17 तोळे सोन्याचे दागिने अप्रामाणिकपणे लपवून ठेवणाऱ्या रिक्षा चालकाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत. 

सोलापूर : रिक्षात विसरलेले पाच लाख 10 हजार रुपयांचे 17 तोळे सोन्याचे दागिने अप्रामाणिकपणे लपवून ठेवणाऱ्या रिक्षा चालकाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत. 

पुण्यात आयटी कंपनीत नोकरी करणारे विजय त्र्यंबकराव जाधव व त्यांची पत्नी स्मिता जाधव हे 1 नोव्हेंबरला रात्री 10च्या दरम्यान हुतात्मा एक्‍स्प्रेसने सोलापुरात आले. दिवाळी सणाकरिता घरी येत असल्याने सोबत दोन मोठ्या बॅग आणि लेडीज पर्स होती. पर्समध्ये 17 तोळे सोन्याचे दागिने होते. रिक्षा भाड्याने ठरवून दोघेही रिक्षाने कर्णिकनगर येथे पोचले. रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळातच त्यांना सोन्याचे दागिने असलेली पर्स रिक्षात विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता रिक्षा दिसली नाही. त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. 

याबाबत माहिती कळताच गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित माने व त्यांच्या पथकाने रात्रभर रिक्षाचा शोध घेतला. रेल्वे स्थानकापासून कर्णिक नगरपर्यंतच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. आवश्‍यक असलेली उपयुक्त माहिती मिळाली नाही. पोलिसांनी जाधव यांना रिक्षा आणि चालकांचे वर्णन विचारले. रिक्षा जुन्या मॉडेलची असून रिक्षाला हेडलाइट नाही एवढीच माहिती जाधव यांच्याकडून समजली. त्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. शोध घेताना एमएच 13 जी 7382 या रिक्षाची माहिती मिळाली. पोलिसांनी चालकाचा शोध घेतला. चालक निशिगंध महादेव तळभंडारे (वय 29, रा. मिलिंदनगर, बुधवार पेठ, सोलापूर) यास ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने दागिने असल्याची कबुली दिली. 

पोलिस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित माने, पोलिस कर्मचारी नंदराम गायकवाड, सचिन होटकर, विनायक बर्डे, मंगेश भुसारे, दत्तात्रय कोळेकर, संजय काकडे यांच्या पथकाने कामगिरी पार पाडली आहे. 

दागिने मित्राकडे, पैशातून दारू पार्टी.. 
पर्समधील रोख रक्कम रिक्षाचालक निशिगंध तळभंडारे याने दारू पिऊन खर्च केल्याचे समोर आले. एक मोठा मोबाईल, पर्स आणि त्यातील कागदपत्रे कळके वस्ती परिसरातील वाहत्या नाल्यात टाकून दिल्याचे त्याने सांगितले. सर्व दागिने मित्र महेंद्र तळभंडारे याच्याकडे दिल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले आहेत.

Web Title: jwellery gives to friend which forget in auto