...अन्‌ ज्योतीला मिळाली ऊर्जा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

कोल्हापूर - फेन्सिंगमधील (तलवारबाजी) राष्ट्रीय मानांकनात आठवे स्थान असलेली खेळाडू ज्योती सुतार हिला आर्थिक कारणांमुळे परदेशातील काही स्पर्धांना मुकावे लागले होते. क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या मुलीच्या यशाची दखल घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिला दरमहा सात हजार रुपये आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्‍यक तेथे लोकसहभागातून आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन दिले आहे. इतकेच नाही तर तिला सात हजार रुपये तिच्या निवासस्थानी पोच करून चंद्रकांत पाटील यांनी गुणी खेळाडूंच्या मागे कोल्हापूरकर भक्‍कमपणे उभे राहतात, असेच जणू दाखवून दिले. 

ज्योती सुतारने तलवारबाजीत 60 पेक्षा अधिक स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदके मिळवली आहेत. गेली 11 वर्षे अनेक स्पर्धांमधून ती कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करीत आहे. फॉईल आणि सेबर प्रकारात खेळणाऱ्या ज्योतीने 18 राष्ट्रीय तसेच 34 राज्यस्तरीय स्पर्धांत यश मिळविले; तर फेडरेशन कप स्पर्धेतही तिने आपल्या खेळाचा ठसा उमटविला आहे. तिचे वडील सुतारकाम करतात; तर आई शिवणकाम करते. तिचा खुराक आणि जीममध्ये जाण्यासाठीही अनेकदा पैसे नसतात. पण, तिच्या आई-वडिलांनी जिद्दीने देशातल्या अनेक स्पर्धांसाठी जाण्यासाठी प्रसंगी कर्ज काढून पैसे उपलब्ध करून दिले. 

दरम्यान, यंदा परदेशातील काही स्पर्धांना जाण्यासाठी किंवा साई क्रीडा संस्थेत दाखल होण्यासाठी आवश्‍यक ते अत्याधुनिक व्हाईट कीट घेण्याची कुवत नसल्याने ती स्पर्धेला जाऊ शकली नाही. ज्योतीला हे व्हाईट कीट, इलेक्‍ट्रॉनिक जॅकेट आणि मास्क घेण्यासाठी आर्थिक मदत मिळविण्यासाठी किंवा तिच्या प्रायोजक मिळविण्याच्या प्रयत्नात तिचे पालक आणि प्रशिक्षक होते. ज्योतीने करवीरवासीयांकडे मदतीचे आवाहन केले होते. यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जुलैचे सात हजार रुपये तिच्या घरी पोच करून दरमहा सात हजार रुपये आणि यापुढील स्पर्धेसाठी आवश्‍यकता पडल्यास लोकसहभागातून मदत देण्याचे आश्‍वासन दिले आहे. या ज्योतीला आता प्रकाशमान होण्यासाठी जणू नवी ऊर्जाच प्राप्त झाली असून, यापुढील स्पर्धांत ज्योती देशाचे नाव उज्ज्वल करेल, अशीच सर्वांची अपेक्षा आहे. 

ज्योतीच्या शिक्षणाप्रमाणे तिच्या खेळासाठीही आम्ही खर्च करीत होतो. परराज्यांतल्या स्पर्धांसाठी अनेकदा कर्ज काढून तिला स्पर्धांना पाठविले. ज्योतीला ताकद देण्यासाठी "सकाळ'ने पाठपुरावा केला. तिच्याविषयीच्या बातमीचा परिणाम म्हणूनच पालकमंत्र्यांनी दरमहा मदत देऊ केली आहे. इतकेच नाही तर या महिन्याचे पैसे पोच करून पुढील स्पर्धांसाठीही मदत देण्याचे आश्‍वासन दिले आहे. 
- अरुण सुतार, पालक 

Web Title: Jyoti Sutar Fencing Seven thousand rupees per month