जोतिबा डोंगर गुलालात रंगला; लाखोंची उपस्थिती

राजकुमार चौगुले
शनिवार, 31 मार्च 2018

देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो भाविकांच्या अलोट गर्दी आणि भक्तिमय गुलालाच्या उधळणीने अवघा डोंगर न्हाऊन निघत आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा देवाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षभरातला सर्वात मोठा उत्सव.

जोतिबा डोंगर (जि. कोल्हापूर) : ढोल कैताळाच्या अखंड ठेक्यात ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा अखंड गजर, सजलेल्या, गगनाला भिडणाऱ्या सासनकाठय़ा, खोबऱ्याचे तुकडे-गुलालाची उधळण, हलगी-ताशांचा कडकडाट..  अशा मंगलमयी वातावरणात ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा (शनिवारी) उत्साही वातावरणात सुरू आहे. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो भाविकांच्या अलोट गर्दी आणि भक्तिमय गुलालाच्या उधळणीने अवघा डोंगर न्हाऊन निघत आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा देवाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षभरातला सर्वात मोठा उत्सव. यानिमित्त शनिवारी पहाटे देवाची काकड आरती, पाद्यपूजा झाली. पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे यांच्या हस्ते देवाला शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाची राजेशाही थाटात पूजा बांधण्यात आली. पूजेनंतर देवाची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. 

यात्रेसाठी गेल्या दोन दिवसांपासूनच लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले होते. राज्यासह परराज्यांतील कानाकोप-यांतून लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या गर्दीने डोंगर परिसर फुलून गेला होता. खोब-याचे बारीक तुकडे आणि गुलालाच्या उधळणीने मंदिराचा परिसर, आलेले नागरिक, भाविक गगनचुंबी सासनकाठय़ांचा भार हातांवर पेलत ढोल-ताशा, हलगीच्या कडकडाटात नृत्य करत होते. चारीही बाजूंनी त्यांना दोरीच्या साहाय्याने आधार देणारे हात हा तोल सांभाळत होते. यात्रेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दुपारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील , जिल्हा धिकारी अविनाश सुभेदार यांच्या सह जिल्ह्यातील बहुतांशी लोकप्रतिनिधींच्या उपस्थिती त सासनकाट्यांची पूजा झाली.

Web Title: Jyotiba yatra in Kolhapur