लाल मातीची लूट!

- शैलेन्द्र पाटील, सातारा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

कास तलावानजीक झाडांसह गौणखनिजाची चोरी; परिसरात जेसीबीची घरघर, सातारा नगरपालिका हतबल कास तलावालगतच्या जंगलातील लाकडांवर पर्यटकांचे मांसाहारी जेवण शिजते, हे आजपर्यंत सर्वज्ञात होते. आता त्यापुढील धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. काही भामट्यांनी ग्रीनहाउस व इतर उपयोगासाठी तलावालगतच्या जंगलातील लाल मातीचे उत्खनन केले आहे. शेकडो ब्रास गौणखनिजाचे बेकायदा उत्खनन करून लूट झाली आहे. हा प्रकार कळूनही सातारा नगरपालिका हतबल ठरली आहे.

कास तलावानजीक झाडांसह गौणखनिजाची चोरी; परिसरात जेसीबीची घरघर, सातारा नगरपालिका हतबल कास तलावालगतच्या जंगलातील लाकडांवर पर्यटकांचे मांसाहारी जेवण शिजते, हे आजपर्यंत सर्वज्ञात होते. आता त्यापुढील धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. काही भामट्यांनी ग्रीनहाउस व इतर उपयोगासाठी तलावालगतच्या जंगलातील लाल मातीचे उत्खनन केले आहे. शेकडो ब्रास गौणखनिजाचे बेकायदा उत्खनन करून लूट झाली आहे. हा प्रकार कळूनही सातारा नगरपालिका हतबल ठरली आहे.

पालिका १०५ हेक्‍टरांची मालक
कास तलाव व परिसरातील सुमारे १०५ हेक्‍टर क्षेत्र सातारा पालिकेच्या मालकीचे आहे. याच तलावातून शहराला पाणीपुरवठा होतो. याच ठिकाणी पालिकेचा ब्रिटिशकालीन बंगलाही आहे. तलावातून होणारा पाणीपुरवठा वगळता पालिकेचे ‘कास’कडे वर्षानुवर्षे दुर्लक्षच झालेले दिसते. त्यामुळे केवळ कास बंगलाच नव्हे, तर एकूणच कास तलाव परिसराला अवकळा आली आहे.

जेसीबी ओरबाडताहेत माती
तलावातील पाण्याच्या बाजूची जमीन दाट वनक्षेत्राने अच्छादली आहे. या जमिनीतील माती जेसीबीने उपसून चोरून नेली जात आहे. कास बंगल्यापासून निघणाऱ्या रस्त्याने खाली, पाण्याच्या दिशेने आले की उजव्या बाजूस दाट झाडीत चार मोठ्ठे खड्डे दिसतात. चार ते पाच ट्रक आरामात लपून राहू शकतील, एवढ्या मोठ्या आकाराचे हे खड्डे आहेत. या ठिकाणची झाडे कापून माती काढून नेण्यात आली आहे. शेकडो ब्रास गौणखनिजाची ही चोरी आहे. ही माती ग्रीनहाउस अथवा मैदान तयार करण्याकरिता वापरली जाते. माती काढल्याने निर्माण झालेल्या खड्ड्यात पावसाळ्यात एखादा माणूस किंवा वाहन पडून दुर्घटना घडण्याचा धोका आहे.

प्लॅस्टिक कचऱ्याचा धोका
तलाव परिसरात येणारे पर्यटक आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा घेऊन येतात. जेवणासाठीच्या पत्रावळ्या, पाण्याचे व चहाचे ग्लास, बाटल्या, द्रोण, दारूच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेस्टन, प्लॅस्टिक पिशव्या आदी कचरा तलावाच्या बाजूच्या झाडीत टाकला जातो. पावसाळ्यात हाच कचरा वाहून तलावात जातो. प्लॅस्टिकचा कचरा वर्षानुवर्षे कुजत नाही. त्यामुळे या प्लॅस्टिक कचऱ्याचा धोका पर्यावरणात घोंगावतो आहे. गेल्या आठवड्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही तास काम केले तर सुमारे १६० पोती कचरा गोळा झाला. हे काम एकूण कचऱ्याच्या पाच टक्के इतकेही नाही. यावरून परिसरात पडलेल्या कचऱ्याची कल्पना येते.

सातारा पालिकेची हतबलता
मालकी क्षेत्रात होत असलेली घुसखोरी दिसत असूनही पालिका प्रशासन व पदाधिकारी काहीच करत नाहीत. त्यातूनच त्यांची हतबलता स्पष्ट होते. ही जागा पालिकेच्या मालकीची असली तरी शहरापासून सुमारे २५ किलोमीटर दूर आहे. तलाव व परिसर मोठा आहे. त्यामध्ये प्रवेश करायला अनेक वाटा आहेत. मोबाईलची रेंजही तलाव परिसरात पोचू शकत नाही. अशा दुर्गम व निर्मनुष्य ठिकाणच्या संरक्षणाची जबाबदारी चार-दोन वॉचमनवर सोपविणे अवघड आहे. पालिकेने यापूर्वी तेथे वॉचमन ठेवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, तेथे काम करायला कामगारही धजावत नाहीत.

खासगी एजन्सीचा पर्याय
नियम व अटींवर कास परिसराच्या देखभालीची जबाबदारी एखाद्या एजन्सीवर द्यावी. येणाऱ्या पर्यटकांकडून ही एजन्सी पर्यावरण शुल्क घेईल. त्यातून कास तलाव व परिसराची स्वच्छता ठेवली जाईल. वृक्षतोड, मद्यपान करून धिंगाणा आदी गैरप्रकार करणाऱ्यांना प्रतिबंध बसेल. त्याचबरोबर पालिकेलाही त्यातून काही प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल, असा एक पर्याय तपासून पाहता येऊ शकतो.

Web Title: kaas lake