चार आण्याची कोंबडी, 12 आण्याचा मसाला 

सुधाकर काशीद
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

महारयत ऍग्रो ही संस्था पन्नास रुपयाला एक याप्रमाणे आपल्या कडकनाथ कोंबडीचे अंडे विकत घेणार म्हणून कोंबड्या पाळणाऱ्यांच्या पोल्ट्रीत अंड्याचा ढीग पडून आहे. संस्थेने कडकनाथ पोल्ट्रीधारकांची फसवणूक केली आहे. कडकनाथ कोंबडीत दोष नाही, अंड्यात दोष नाही, पण फसवणुकीच्या प्रकारामुळे कोल्हापूर सांगली परिसरात कडकनाथ कोंबडी व तिच्या अंड्याकडे सर्वजण तिरक्‍या नजरेने पाहू लागले आहेत.

कोल्हापूर - तीस रुपये किलो दराचे खाद्य, पोषणासाठी स्वतंत्र शेड, ठराविक कालावधीनंतर करावे लागणारे औषध पाणी आणि कमाई मात्र एक पैशाची नाही, अशा पद्धतीने कडकनाथ कोंबडीपालन करणाऱ्यांच्या वाट्याला चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, या म्हणीची साक्षात प्रचिती आली आहे. महारयत ऍग्रो ही संस्था पन्नास रुपयाला एक याप्रमाणे आपल्या कडकनाथ कोंबडीचे अंडे विकत घेणार म्हणून कोंबड्या पाळणाऱ्यांच्या पोल्ट्रीत अंड्याचा ढीग पडून आहे.

संस्थेने कडकनाथ पोल्ट्रीधारकांची फसवणूक केली आहे. कडकनाथ कोंबडीत दोष नाही, अंड्यात दोष नाही, पण फसवणुकीच्या प्रकारामुळे कोल्हापूर सांगली परिसरात कडकनाथ कोंबडी व तिच्या अंड्याकडे सर्वजण तिरक्‍या नजरेने पाहू लागले आहेत. त्या कोंबड्यांचे पालन करता करता पोल्ट्रीधारक अक्षरशः घाईला आले आहेत आणि चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, काय असतो हे प्रत्येक दिवशी अनुभवत आहेत. 

इस्लामपूर येथील महारयत संस्थेने पन्नास रुपयाला एक अंडी विकत घेण्याची ग्वाही देऊन अनेकांच्या गळ्यात कडकनाथ कोंबड्या घातल्या. पन्नास रुपयाला एक अंडे म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजूनच अनेकजण या संस्थेच्या गळाला लागले. 

त्यांनी आपापल्या क्षमतेनुसार रक्कम गुंतवून कोंबड्या घेतल्या त्यासाठी शेड व इतर गुंतवणूक केली. सुरवातीला पन्नास रुपयाला एक अंडे अशी खरेदी संस्थेने केली, पण कुठेतरी गणित बिघडले व अंड्यांची खरेदी करणे संस्थेने थांबवले. त्यामुळे अंडी खुल्या बाजारात पोल्ट्रीधारक खपवण्याचा प्रयत्न करू लागले; पण पन्नास रुपयाला एक अंडे म्हणजे ते अंडे काय सोन्याचे आहे का? असे उपहासाने विचारून ही अंडी नाकारू लागले. आता कोल्हापूर जिल्ह्यातील साधारण पंधराशे जणांकडे लाखभर कोंबड्या आहेत. 

साधारणतः पाच लाख अंडी पडून आहेत. अडचणीत आलेल्या या पोल्ट्रीधारकांकडून अतिशय अल्प भावाने अंडी मागितली जात आहेत. 400 रुपये किलो दराची कोंबडी दोनशे रुपयाला मागत आहेत. सोन्याचे अंडे म्हणणाऱ्या या कोंबडीच्या अंड्याचा दर 50 रुपयावरून चार ते पाच रुपये असा झाला आहे. एकदा अंडी विकून संपू देत, म्हणून पोल्ट्रीधारक येईल त्या दराने ही अंडी विकण्याचा प्रयत्न करत आहेत. येईल त्या दराने कोंबड्या विकायच्या म्हटल्या तर त्यात मात्र मोठा तोटा आहे. कारण ही कोंबडी काळी, मटन काळे, रक्त काळे, हाडेही काळी, त्यामुळे सर्वसाधारण ग्राहक यापासून लांबच आहे. 

या पार्श्‍वभूमीवर कोंबड्या पाळणारे खूप अडचणीत आले आहेत. फसवणूक केलेल्या संस्थेवर काय गुन्हा दाखल होणार, त्याचे पुढे काय होणार, हा त्या पुढचा प्रश्‍न आहे; पण तूर्त तरी कोंबडीच्या मसाल्यावर रोज बारा आणे खर्च करणारी पोल्ट्रीधारक मेटाकुटीला आले आहेत. सोन्याचे अंडे दाखवून फसवणूक करण्याची नवी पद्धतच यामुळे उघडकीस आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadaknath hen fraud case special story