तुकाराम महाराजांनी कर्जाचे कागद फाडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

माणसं कशी मोठी होतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. हातात काहीही नसताना आयुष्यात खूप मोठं यश मिळविलेले अनेक लोक आहेत. अशा मोठ्या व्यक्तींचा अनुभव सोलापूरकरांना मिळावा यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दोन्ही वक्‍त्यांनी आज रसिकांना अमृत पाजले. 
- सुशीलकुमार शिंदे,  माजी केंद्रीय मंत्री

सोलापूर - संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे सकाळी निधन झाले. गावाला ही खबर सांगितली तर शेतकरी पेरायला जाणार नाहीत म्हणून त्यांनी दिवसभर वडिलांचे शव झाकून ठेवले, संध्याकाळी गावाला ही खबर दिली. तुकाराम महाराज सावकार होते. प्रत्येक गोष्टीचा हिशेब लिहून ठेवायचे. दुष्काळ आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या पैशांचे कागद फाडून टाकले. आजच्या सरकारमध्ये मात्र आत्महत्येनंतरही शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज चढते. ‘तुक्‍याने कर्जाचे कागद फाडले, इथे मड्यावरी व्याजही चढले’ ही स्थिती कोणीतरी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सांगावी, अशी अपेक्षा अकोल्याचे ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केली. 

शेतकऱ्यांची व्यथा मांडणाऱ्या ‘पेच’ कविता सादर करून डॉ. वाघ यांनी शेतकऱ्यांच्या आजच्या व्यथेवर प्रकाश टाकला. ‘लेकुरवाळा विठू घेत असे फाशी, रुक्‍माईला पेच सांगा जगू कशी’ कवितेतील या ओळींनी सभागृह स्तब्ध झाले.

दमाणी- पटेल प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या कर्मयोगी पुरस्काराने काल डॉ. वाघ व अभिनेते सयाजी शिंदे यांना माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अभिनेते शिंदे यांचा झाडांबद्दलचा जिव्हाळा आणि डॉ. वाघ यांची शेतकऱ्यांबद्दलची कृतिशील तळमळ ऐकून उपस्थितांनी त्यांच्या कार्याला टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. 

यावेळी बिपीनभाई पटेल, प्रेमरतन दमाणी, माजी आमदार रामदास फुटाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक पटेल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले. आभार फुटाणे यांनी मानले. 

शेतकरी आज संपावर जातोय, शेती नको म्हणतोय. मी माझ्या कवितेमधून जी भीती व्यक्त केली होती, ती भीती आज दुर्दैवाने खरी होत आहे. जगात सर्वाधिक छळ आज शेतकऱ्यांचा होत आहे. समाजातील बुद्धिवंतांनी त्याला वाचा फोडावी. मी नुसत्या कविता लिहीत नाही तर कापसाला दर मिळावा म्हणून तुरुंगात गेलो, पायी दिंडी काढल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. नुसते यमक जुळविणे म्हणजे कविता नाही तर समाजाशी एकरूप झाल्याशिवाय कविता होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणुकीचा खर्च झाडासाठी...
सध्याचा काळ हा निवडणुकीचा आहे. या निवडणुकीसाठी किमान १० ते २० कोटी रुपये लागतात. मला पण कोणीतरी उमेदवारी द्या. निवडणुकीला होणारा खर्च मी झाडे लावण्यासाठी करेन. खासदार झाल्यानंतर माझी ओळख पाच वर्षांसाठी होईल, परंतु झाडे लावल्यानंतर माझी ओळख पिढ्यांपिढ्यासाठी होईल, असा विश्‍वास अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. ‘ट्री-स्टोरी’ फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नर्सरी स्थापन करून वृक्षारोपणाची मोहीम अधिक व्यापक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कलावंतांनी कधी भीक मागू नये. अभ्यास करा, कष्ट करा, तुमच्यातील गुणवत्ता वाढवा, संधी तुमच्याकडे आपोआप येईल, असा सल्लाही त्यांनी दिला.

माणसं कशी मोठी होतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. हातात काहीही नसताना आयुष्यात खूप मोठं यश मिळविलेले अनेक लोक आहेत. अशा मोठ्या व्यक्तींचा अनुभव सोलापूरकरांना मिळावा यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दोन्ही वक्‍त्यांनी आज रसिकांना अमृत पाजले. 
- सुशीलकुमार शिंदे,  माजी केंद्रीय मंत्री

Web Title: Kadamyogi Award by the Damani-Patel Foundation to Dr. Wagh and actor Sayaji Shinde