निवडून गेलं, की पाच वरसं तोंड बघत न्हाईत

- बलराज पवार
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

ताकारी, टेंभूच्या पाण्याने समृद्ध झालेला कडेगाव तालुका. जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे ८ गण आहेत. निवडणूक प्रचाराचा राजकीय धुरळा उडू लागला आहे. वातावरणात गर्मी. प्रचारातही निरुत्साह जाणवला. प्रचाराच्या कामासाठी वेळ देणारे कार्यकर्ते दिसत नाहीत. दुपारी बैठका आणि शेतीची  कामे संपल्यानंतर सायंकाळी फेऱ्यांना, चौक सभांना जोर येतो. नेते, उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेताहेत.

ताकारी, टेंभूच्या पाण्याने समृद्ध झालेला कडेगाव तालुका. जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे ८ गण आहेत. निवडणूक प्रचाराचा राजकीय धुरळा उडू लागला आहे. वातावरणात गर्मी. प्रचारातही निरुत्साह जाणवला. प्रचाराच्या कामासाठी वेळ देणारे कार्यकर्ते दिसत नाहीत. दुपारी बैठका आणि शेतीची  कामे संपल्यानंतर सायंकाळी फेऱ्यांना, चौक सभांना जोर येतो. नेते, उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेताहेत. काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार पतंगराव कदम, जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची या भागात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीला सोबतीला घेतलेय. या दोन तालुक्‍यांत निवडणुकीची चुरस आहे...
 

ताकारीनजीक सागरेश्‍वर अभयारण्यापासून कडेगाव तालुका सुरू होतो. तसे अभयारण्य वाळवा, पलूस  आणि कडेगाव या तालुक्‍यांच्या सीमेवर आहे. तेथून पाच किलोमीटरवर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव देवराष्ट्रे. गावात भर दुपारी नीरव शांतता. पान टपरी, खोकीवजा दुकानात वयस्क मंडळी दिसतात. निवडणुकीबद्दल फारसं कुणी बोलत नाही. एका शेडमध्ये काही तरुण बसलेले. सहज चौकशी केली तर त्यांनी आम्ही ‘सर्व्हे’वाले आहोत असा समज करून घेतला. एकाने सरळ येथे ‘ओन्ली...’ असं नेत्यांचं नाव घेतलं. एकूणच त्यांची सोय झाल्याचे लक्षात आले. एकाने तशी कबुलीही दिली. जेवणाच्या जुळणीत आहोत, असेही म्हणाला. मोहित्यांचे वडगावच्या एस. टी. स्टॅंडवर मंडळी निवांत बसलेली दिसली. जवळच प्रचाराची गाडी होती. जुनी, जाणती मंडळी आजही शेकापच्या आठवणी सांगत होती.

वडगावहून पुढे जाताना ताकारीचे पाणी कालव्यातून वाहताना दिसते. पाण्याने शिवारं हिरवीगार केलीत. सलग उसाचे मळे दिसतात. मध्येच केळी, द्राक्षांचेही दर्शन होते. एकूणच परिसर सधन बनल्याचे जाणवते. कुठे उसाची लावण सुरू आहे. कुठे भांगलणीची कामे महिला करीत आहेत. असे चित्र दिसले. अंबक, चिंचणीतही दुपारी शांतताच. मध्येच ध्वनिक्षेपकावरून प्रचाराचा आवाज देणारी गाडी समोर येते. एवढीच काय ती निवडणूक. सोनहिरा कारखान्यावरून कडेगावकडे  जाताना वाटेत तडसरजवळ माजी मंत्री आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम थांबलेले दिसले. कुणा कार्यकर्त्याकडे सांत्वनासाठी जाणार होते. ‘वातावरण चांगले आहे. नेर्ली, शाळगाव, वांगी, नेवरी येथे सभा आहेत’ असे ते म्हणाले. खरे तर सत्तरीतील ते पण या वयातही प्रचाराचा धडाका, उत्साह तरुण कार्यकर्त्यांला लाजवणाराच.

परतताना अंबकजवळ शेतात काही महिला भांगलताना दिसल्या. निवडणूक म्हणताच... त्यांनी जणू संतापच व्यक्त  केला. कशाला फिरायचं प्रचारात? काय  मिळतंय? आन्‌ त्यानं काय पोटाची खळगी भरत्यात...एकदा निवडून गेले, की परत पाच वरसं तोंड बघत न्हाईत...त्यांचं चालतंय...
त्यांच्याशी झालेला संवाद - 
किती मजुरी मिळते?.. 
दीडशे रुपये... 
पण योजनेचं पाणी आलंय की... 
ते आलंय त्यामुळं पीक येतंय...चांगलं हाय.. पण बाकीची कामं होत नाहीत...

या महिलांत एक ग्रामपंचायत सदस्या होती...आम्ही चकीत झालो... 
अजून आहात की माजी... 

हाय, अजून सहा महिनं...पण काय उपयोग नाही...आमची कामं कोण करत नाहीत.. एक रस्ता करा म्हणून मागं लागलोय त्योपण हुईना.. 

मग आरक्षणाचा फायदा ? 

असा प्रश्‍न पडला. केवळ आरक्षण दिलंय म्हणून यांना उभं करायचं फॅड आलंय का?

एकूणच काँग्रेस, भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या तालुक्‍यात सकाळ, सायंकाळची वेळ प्रचारासाठी योग्य होती. तरुणांत दुपारीच ‘कार्यक्रम’ सुरू होता हे दुर्दैवी चित्रही पहायला मिळाले. बाकी कार्यकर्त्यांना जेवणावळी, मतदारांशी योग्य संपर्क हा साधारण माहौल सुरूच आहे.

Web Title: kadegaon taluka