गडहिंग्लज हद्दवाढीभोवती फिरणार राजकारण

गडहिंग्लज हद्दवाढीभोवती फिरणार राजकारण

गडहिंग्लज - गेल्या ३५ वर्षांपासून रखडलेल्या शहर हद्दवाढीला शासनाने अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर शहरात आमदार हसन मुश्रीफ व म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन आमनेसामने आले. यावरून मुश्रीफ व घाटगे यांच्याकडून हद्दवाढीच्या यशाचा लाभ उठवण्यासह त्यांचे राजकारणही हद्दवाढीभोवती फिरणार असल्याची प्रचीती येते. 

बड्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने हद्दवाढीचा प्रश्‍न घाटगे व मुश्रीफ यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांकडेही नेला. परंतु, गडहिंग्लज शहर कागल विधानसभा मतदारसंघात येत असल्याने घाटगे व मुश्रीफ यांनी या प्रश्‍नाभोवती अधिक पिंगा घालण्यास सुरवात केली. लोकसभा आचारसंहितेपूर्वी अंतिम मंजुरी मिळाल्याने मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर घाटगे यांनी पालकमंत्री पाटील व श्री. फडणवीस यांचेही आभार मानले. अंतिम मंजुरीसाठी आवश्‍यक असलेल्या शासनाच्या इच्छाशक्तीच्या बळानेही गडहिंग्लजच्या हद्दवाढ प्रश्‍नाला अखेर यश मिळवून दिले. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजप नेते घाटगे यांनी लढण्याची तयारी केली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षभरापासून दोघांमध्येही आरोप-प्रत्यारोप गाजत आहेत. सामाजिक उपक्रमांतून दोन्ही नेते जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच आता हद्दवाढीचा प्रश्‍न सुटल्याने दोन्ही नेते त्याचा लाभ उठवण्यासाठी धडपड करीत आहेत. नोव्हेंबरमध्ये उद्‌घोषणा झाल्यानंतरही घाटगे व 
मुश्रीफ समर्थकांचे शहरात पोष्टर युद्ध चर्चेत आले होते.

त्यानंतर अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर तर दोन्ही नेत्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. इतकेच नव्हे तर आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन शहरभर फेरी मारली. फटाके उडविले. आपापल्या नेत्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. दसरा चौकात दोन्ही गटातील कार्यकर्ते आमने-सामने आले. या जल्लोषातून कागलमधील टोकाचे राजकारण पहिल्यांदाच गडहिंग्लजकरांनी अनुभवले. 

सध्या लोकसभेचे रणांगण पेटले आहे. आणखीन सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक येणार आहे. या दोन्ही निवडणुकांत हद्दवाढ प्रश्‍नाचा लाभ आपल्याच पक्षाला व्हावा यासाठी दोन्ही पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. विशेष करून आगामी विधानसभा निवडणुकीत हद्दवाढ मंजूरीभोवती राजकारण फिरणार असल्याचा प्रत्यय आतापासूनच येत आहे. लोकसभा निवडणुकीतून अनेक मतदारसंघात विधानसभेचेही तीर मारले जात आहेत. यात कागल विधानसभेतील नेतेही मागे राहिलेले नाहीत. त्यातच आता हद्दवाढ मंजूरीचा मुद्दा मिळाल्याने आगामी निवडणुकीत या प्रश्‍नाच्या श्रेयवादाचे राजकारण मात्र नक्की रंगणार असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. 

गडहिंग्लजवरच अधिक लक्ष
गडहिंग्लज पालिकेत जनता दल सत्तेत आहे. पर्यायाने शहरात जनता दलाची ताकद दुर्लक्षून चालत नाही हे सर्वच नेत्यांना माहीत आहे. कागलनंतर गडहिंग्लजमध्येच जास्त मते आहेत. येथे एकूण वीस हजारांवर मतदार आहेत. यामुळे कागलच्या दोन्ही नेत्यांनी कागलसह गडहिंग्लजवर अधिक लक्ष ठेवले आहे. जनता दलाचीही साथ मिळावी म्हणून दोन्ही पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. कार्यक्रम, उपक्रमांची रेलचेलही दोन्हींकडून वाढली आहे. शहरातील निर्णायक मते पदरात पाडून घेण्यासाठी अनेक प्रयत्नांपैकी एक असलेला हद्दवाढीचा मुद्दाही गाजणार यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com